Success Story : अलीकडे आपल्या देशात शेतीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जण आपल्या हक्काच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवत शेती व्यवसायात नवीन करिअर घडवू पाहत आहेत. विशेष म्हणजे असे हे ध्येयवेडे नवयुवक शेती व्यवसायात सक्सेसफुल बनत इतरांसाठी मार्गदर्शक असं काम करत आहेत. दरम्यान आज आपण सातारा जिल्ह्यातील अशाच एका ध्येयवेढ्यात तरुणाची शेतीमधली यशोगाथा जाणून घेणार आहोत.
ज्याने वायरमनची नोकरी सोडत आपल्या वडिलोपार्जित शेत जमिनीपैकी सहा गुंठे शेत जमिनीत स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करत लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्याच्या कास पठार परिसरातील चिकनवाडी कुसुंबी येथील तुकाराम चिकणे या नवयुवक शेतकऱ्याने ही किमया साधली असून सध्या पंचक्रोशीत तुकाराम दादांची चांगलीचं चर्चा पाहायला मिळत आहे.
तुकाराम दादांनी वायरमनची नोकरी सोडून आपलं स्वतःच हक्काचं असं काम करावं या हेतूने शेती करण्याचा निर्णय घेतला. शेती सुरू केल्यानंतर त्यांनी आपल्या शेतीत वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग करायला सुरुवात केली. याच प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सहा गुंठे शेत जमिनीत स्ट्रॉबेरीचा मळा फुलवण्याचा निर्णय घेतला. यासाठी जमिनीची मशागत केली. मशागतीच्या वेळी शेणखत आणि जीवामृत वापरले गेले.
यानंतर चार फुटावर स्ट्रॉबेरी लागवडीसाठी बेड तयार झालेत. मग स्ट्रॉबेरीची पाच हजार रोपे या बेडवर लावण्यात आली. स्ट्रॉबेरी लागवड केल्यानंतर तज्ञांच्या सल्याने कीटकनाशक आणि औषधाचे फवारणी केली. पाणी व्यवस्थापनासाठी त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला. लागवड केल्यानंतर तीस दिवसांनी पीक फुलोरा अवस्थेत आले आणि अवघ्या दोन महिन्यात यापासून त्यांना उत्पादन मिळण्यास सुरवात झाली.
पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळपास 60,000 चा खर्च त्यांना या कामी आला. त्यांनी उत्पादित केलेल्या स्ट्रॉबेरी फळाचे वजन दीडशे ग्रॅम पर्यंत भरत असून स्ट्रॉबेरी लाल आणि अगदी रसाळ अशी आहे. विशेष म्हणजे शंभर रुपये बॉक्स प्रमाणे मुंबई, पुण्यासारख्या शहरात त्यांची स्ट्रॉबेरी विक्री होत आहे. 60 हजार रुपये खर्च करून लागवड करण्यात आलेल्या या स्ट्रॉबेरी पिकातून त्यांना जवळपास दोन लाखांची कमाई होणार आहे.
म्हणजेच खर्च वजा जाता 6 गुंठे शेत जमिनीतून एक लाख 40 हजारांची कमाई त्यांनी करून दाखवली आहे. निश्चितच तुकाराम दादांचा हा प्रयोग इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील वेड लावणारां आहे. मनात एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी उतुंग इच्छाशक्ती असेल आणि त्या अनुषंगाने कष्ट करण्याची धम्मक असली तर निश्चितच कमी शेतजमिनीतून देखील लाखो रुपयांची कमाई होऊ शकते हेच तुकाराम यांनी दाखवून दिले आहे.