Success Story Of Asian Paints :- कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही अगदी विस्तारित किंवा मोठ्या स्वरूपात करता येत नाही. सुरुवात अगदी छोटीशी करावी लागते आणि हळूहळू कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर त्यामध्ये वाढ करत जाणे गरजेचे असते. अगदी तुम्ही एखादे झाड जरी लावायचे ठरले तरी त्याचे छोटेसे रोप तुम्हाला लावणे गरजेचे असते व कालांतराने त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होते. एवढेच कशाला जर तुम्ही नदीचा उगम पाहिला तर उगमस्थानी नदीचे पात्र अगदी छोटेसे असते.
परंतु जसजशी उगमस्थानापासून नदी लांब वाहत जाते तसे तसे तिचे पात्र विस्तीर्ण होत जाते. म्हणजेच यावरून आपल्याला दिसून येतो की कुठलीही सुरुवात अगदी छोट्या पद्धतीने होत असते आणि कालांतराने त्याचे मोठ्या स्वरूपात रूपांतर होते. अगदी हाच मुद्दा एशियन पेंट या रंग निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. एका गॅरेज मधून सुरू झालेला या कंपनीचा प्रवास आज 3 लाख कोटींचा टर्नओव्हर पर्यंत पोहोचला आहे. याच कंपनीची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
एशियन पेंट्सचा प्रवास
एशियन पेंटचे सहसंस्थापक आणि गैर कार्यकारी संचालक अश्विन सूर्यकांत दाणी यांचे नुकतेच निधन झाले. साधारणपणे 1968 पासून ते या कंपनीशी संबंधित होते. 1998 ते 2009 या कालावधीमध्ये ते कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक देखील होते व 2018 ते 2021 या कालावधीत त्यांनी या कंपनीचे बोर्ड आणि कंपनीचे अध्यक्ष पद देखील भूषवले. जर आपण या कंपनीची सुरुवात पाहिली तर अश्विन दाणी यांच्या वडिलांनी त्यांच्या चार मित्रांना सोबत घेऊन या कंपनीची सुरुवात केली होती.
परंतु अश्विनी यांनी या कंपनीला खूप मोठी भरारी मिळवून दिली. या कंपनीचे तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून जी काही प्रगती आहे त्याचे श्रेय हे अश्विन दाणी यांना जाते. एशियन पेंट्स या कंपनीचा व्यापार वाढावा याकरिता आश्विन दाणी यांनी 1970 मध्ये एक सुपर कम्प्युटर सीडीसी 6600 खरेदी केला. तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून परदेशातून त्यांनी हा कम्प्युटर मागवला होता. या सुपर कम्प्युटरच्या मदतीने त्यांनी एशियन पेंट साठी आवश्यक असलेला संपूर्ण डेटाचा मागोवा ठेवला होता.
जसे देशात कोणत्या ठिकाणी कोणता रंग जास्त विकला जातो किंवा किती विकला जातो आणि त्यातून नफा किती अशा पद्धतीचा डेटा मागविण्यात याची खूप मदत झाली. त्यामुळे ज्या भागांमध्ये ज्या रंगाची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत होती त्या ठिकाणी कंपनीने त्या रंगाचा साठा आधीच नियोजन करून भरून ठेवण्यास कंपनीला यामुळे मदत झाली व कंपनीचा व्यवसाय वाढत गेला. या सुपर कम्प्युटरमुळे एशियन पेंटचा महसूल ६० वर्षांपासून प्रत्येक वर्षी 20 टक्के दराने वाढल्याचे सांगितले जाते.
या कॅम्पुटर मुळे कंपनीला त्याचे मार्केटिंग नेटवर्क वेगाने पसरवण्यास मदत झाली. जेव्हा हा महासंगणक भारतामध्ये आला तेव्हा इसरो आणि आयआयटी ला देखील सुपर कम्प्युटर मिळायला बरीच वर्षे लागली. भारताचा पहिला स्वदेशी सुपर कम्प्युटर 1987 मध्ये तयार झाला. परंतु मुंबईतील गॅरेज मध्ये बसून पाहिलेल्या वडिलांच्या स्वप्नाला मात्र अश्विन दाणी यांनी खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेले.
कशी होत गेली एशियन पेंट्समध्ये वाढ?
हा कालावधी साधारणपणे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा होता. 1942 मध्ये भारत स्वतंत्र करण्याचा लढा सुरू होता व त्याचवेळी ब्रिटिशांनी बाहेरून रंग आयात करण्यास बंदी घातली. तेव्हा मात्र चार मित्रांनी स्वदेशी कंपनी काढण्याचा विचार केला. जेणेकरून परदेशावरील रंगांच्या बाबतीत असलेले अवलंबित्व कमी करता येईल हा त्यामागचा उद्देश होता. या चार मित्रांमध्ये चंपकलाल चोक्सि, चिमणलाल चोक्सी, सूर्यकांत दानी आणि अरविंद वकील हे मुंबईतील फरास रोडवर असलेल्या एका गॅरेज मध्ये बसले होते.
या ठिकाणी बसले असतानाच त्यांना पार्टनरशिप मध्ये स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा विचार मनामध्ये आला व त्यांनी पेंटचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला. या कंपनीची अधिकृतपणे सुरुवात एक फेब्रुवारी 1942 रोजी झाली व तेव्हा तिचे नाव ते द एशियन ऑइल अँड पेंट कंपनी असे होते.या कंपनीचे नाव शोधण्याचा त्रास कमी व्हावा याकरिता त्यांनी टेलिफोन डिरेक्टरी मधून हे नाव घेतले होते. जेव्हा एशियन पेंटची निर्मिती झाली तेव्हा भारतामध्ये सुरू असलेल्या मोठ्या आणि प्रसिद्ध पेंट कंपन्यांशी स्पर्धा करायची होती व यामध्ये नाव देखील मिळवायचे होते.
परंतु यामध्ये खूप मोठ्या अडचणी होत्या. सुरुवातीला रंगांची छोटी छोटी पाकिटे तयार करून हे चौघे मित्र घरोघरी विकायचे. हळूहळू त्यांचा रंग लोकांना आवडू लागला. अगदी सुरुवातीला ही कंपनी पांढरा, काळा, लाल, हिरवा आणि पिवळा ही पाचच रंग बनवत होती. परंतु नंतर मात्र यांनी क्षेत्र वाढवायचे ठरवले व कंपनीचा व्यवसाय देखील वाढवायला सुरुवात केली. 1942 ते 1945 या तीन वर्षाच्या कालावधीत कंपनीने साडेतीन लाख रुपयांची उलाढाल तेव्हा केली.तेव्हा कंपनीचे मार्केटिंग इतके तगडे होते की 1952 पर्यंत या कंपनीचे उलाढाल 20 कोटींपेक्षा जास्त झाली. कंपनीची कमाई तर सतत वाढत होती.परंतु त्यांची इच्छा होती की ग्राहकांच्या ओठावर सहजतेने कंपनी यायला पाहिजे. म्हणून त्यांनी एक स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले.
1954 मध्ये एशियन पेंट्स ने स्वतःचा शुभंकर गट्टू लॉन्च केला
1954 मध्ये एशियन पेंट्स ने आपला शुभंकर गट्टू लॉन्च केला व तो प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी तयार केलेला होता. हा शुभंकर लोकांसमोर कंपनीने ठेवला व त्यांना नाव देण्यास सांगितले. यामध्ये पन्नास हजार लोकांनी कंपनीला पत्रे पाठवली व शेवटी गट्टू हे नाव निश्चित करण्यात आले व यातील विजेत्याला पाचशे रुपयांचे बक्षीस देण्यात आले. त्यानंतर कंपनीने सर्वात लोकप्रिय ब्रँड ट्रॅक्टर डिस्टेंपर पॅन्टसह गट्टूचा शुभंकर वापरला. कंपनीचा हा प्रयोग यशस्वी झाला व पेंटची विक्री देखील गगनाला पोहोचली.
एशियन पेंटचा पहिला पेंट प्लांट भांडुप येथे स्थापन
एशियन पेंट्सने आपला पहिला पेंट प्लांट भांडुप मुंबई येथे स्थापन केला आणि त्याच्या उत्पादनाची श्रेणी देखील वाढवली. त्यानंतर 1960 च्या दशकामध्ये कंपनीने फिजीमध्ये आपला पहिला परदेशी प्लांट स्थापन केला. आज कंपनीचे भारतात सहा प्लांट आहेत. तसेच ही कंपनी आता पंधरा देशांमध्ये कार्यरत असून जगभरात सत्तावीस पेंट उत्पादन सुविधा देत आहे. 65 पेक्षा जास्त देशांमध्ये ग्राहकांना ही कंपनी सेवा देते. एशियन पेंटच्या माध्यमातून हजारो रंग, थिम, टेक्सचर आणि शेड्सची पेंट्स बनवले जात आहेत.
अगदी कमीत कमी किमतीपासून ते महागडे पेंट्स या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. एशियन पेंट ही जगातील अशी कंपनी आहे की जिला 2004 मध्ये फोर्ब्स अंडर ये बिलियन कंपनीत इन द वर्ल्ड अवॉर्ड देखील मिळालेला आहे. तसेच 2005 मध्ये ब्रिटिश सुरक्षा परिषद ने कंपनीच्या चार प्लांटना सोर्ड ऑफ ऑनर ने देखील सन्मानित केले आहे. 2008 मध्ये एशियन पेंट चा टर्नओव्हर 3000 कोटी रुपये होता.
आज या कंपनीने भारतात 50% पेक्षा जास्त बाजारपेठेवर कब्जा मिळवला आहे. तसेच आशिया खंडात ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज कंपनीचा व्यवसाय हा तीन लाख करोड रुपयांच्या पुढे आहे. दीपिका पादुकोण तसेच करण जोहर, रणबिर कपूर आणि रणबीर सिंह यासारखेमोठे अभिनेते देखील या कंपनीची जाहिरात करतात. अशा पद्धतीने अगदी छोट्याशा प्रमाणात सुरू झालेली आणि गॅरेजमधून सुचलेली या व्यवसायाची कल्पना आज गगनाला गवसणी घालताना दिसून येत आहे.