Success Story:- पूर्वी घरांमध्ये मुलीचा जन्म झाला की प्रामुख्याने कुटुंबाला ते एक ओझं वाटायचं. कारण मुलगी झाली म्हणजे तिच्या लग्नाला येणारा खर्च आणि इतर खर्च हा सगळ्यात मोठा प्रश्न आई-बाबांच्या समोर राहायचा. परंतु आता कालांतराने परिस्थितीमध्ये खूप मोठा बदल होत असून हुंड्यासारख्या कुप्रथा जवळपास हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत.
तसेच मुलींच्या बाबतीत जर बघितले तर शिक्षण आणि त्यासोबत प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आता मुलांच्या बरोबरीने किंबहुना मुलांच्या एक पाऊल पुढे त्याच्या आपल्याला दिसून येत आहेत. अगदी प्रशासकीय सेवा असो की पायलट्स, संरक्षण सेवा, सामाजिक तसेच आर्थिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये आता मुलींनी बाजी मारल्याचे सध्या चित्र आहे.
तसेच वारसाला दिवा हवा म्हणून मुलाचा जन्म ही बाब देखील आता मागे पडत चालली असून समाजामध्ये काळानुरूप आता खूप मोठा बदल घडलेला आहे. तसेच सरकारच्या माध्यमातून देखील मुलींना शिक्षणाच्या बाबतीत प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आल्यामुळे अनेक सकारात्मक बदल आणि परिणाम आपल्याला दिसून येत आहेत
व त्याचेच परिणीती मुलींच्या शैक्षणिक तसेच सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून दिसून येत आहे. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण बिहार राज्यातील सारण जिल्ह्यातील सात बहिणींची यशोगाथा पाहिली तर ती थक्क करणारी आहे.
बिहार मधील सात बहिणींची यशोगाथा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिहार मधील सारण जिल्ह्यातील रहिवासी असलेले राजकुमार सिंह यांना सात मुली आहेत. त्यामुळे समाजामध्ये देखील त्यांना यामुळे अनेकदा टीका, लोकांकडून ऐकावे लागणारे टोमणे सहन करावे लागले.
परंतु आज त्यांच्या या लेकींनी पूर्ण समाजामध्ये राजकुमार सिंह यांची मान उंचावली आहे व ते आज अभिमानाने या समाजापुढे उभे देखील आहेत. सरना जिल्ह्यातील एकमा या गावच्या या सात बहिणींनी असे काम करून दाखवले आहे की कोणी स्वप्नात सुद्धा याचा विचार करू शकणार नाहीत.
आपण राजकुमार सिंह यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर ते गिरणी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वंशाचा दिवा हवा म्हणून मुलगा होईल या अपेक्षेने ते सात मुलींचे पिता बनले व आठवा मुलगा झाला. यामुळे राजकुमार सिंह यांना लोकांकडून अनेक पद्धतीचे टोमणे ऐकावे लागले.
परंतु या सगळ्या गोष्टींकडे राजकुमार यांनी दुर्लक्ष केले. आपल्या मुलींना मेहनत करून त्यांनी शिकवले. जेव्हा ते मुलींचे शिक्षणासाठी प्रयत्न करत होते तेव्हा नातेवाईक देखील त्यांना मुलीचे शिक्षण बंद कर व लग्न करून टाक असे सांगत होते. परंतु राजकुमार सिंह यांनी हे सगळे बोलण्याकडे दुर्लक्ष केले व मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न चालू ठेवले.
वडिलांच्या या अफाट कष्टाचे देखील मुलींनी सार्थक करून दाखवले व सरकारी सेवेत सगळ्या मुली अधिकारी पदावर रुजू झाले आहेत. मुलींनी देखील अनेक समस्यांना तोंड देत नोकरीसाठी प्रयत्न केले व कष्ट घेऊन आज त्या अधिकारी पदांवर आहेत.
यामध्ये अगदी सुरुवातीला सर्वात मोठी बहीण राणी कुमारी सिंह दुसरी बहीण रेणू कुमारी सिंह या बिहार पोलीस दल आणि सशस्त्र सीमा दलामध्ये भरती झाल्या. नंतर या दोन्ही बहिणीकडून प्रोत्साहन आणि प्रेरणा घेऊन बाकीच्या पाच बहिणी सोनीकुमारी या सीआरपीएफमध्ये, प्रीती कुमारी या क्राईम ब्रँचमध्ये, पिंकी कुमारी या एक्साईज पोलीसमध्ये, पिंकी कुमारी या बिहार पोलीस दलात तर नन्ही कुमारी या जीआरपी सारख्या दलामध्ये आज अधिकारी पदावर नियुक्त असून कार्यरत आहेत.
मुलींच्या या दैदीप्यमान यशामुळे वडील राजकुमार सिंह यांना आज आकाश ठेंगणे झाले असून समाज तसेच नातेवाईकांकडून जे त्यांना सततचे टोमणे ऐकायला येत होते तेच लोक आज त्यांच्याशी आदराने बोलतात.
इतकेच नाही तर या सात बहिणींच्या कामगिरीमुळे त्यांच्या गावाच्या आजूबाजूला असलेल्या इतर गावातील मुली देखील आता पोलीस दलाची तयारी करून पोलीस दलामध्ये भरती होत आहे.
या प्रकारे समाजातील लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून आपल्याला जे मिळवायचे ते खंबीरपणे, जिद्दीने व कष्ट करून मिळवणे हे खूप महत्त्वाचे असतं हे या सात बहिणींच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.