स्पेशल

चर्चा तर होणारच ! 10 एकरात ‘या’ पिकाची लागवड केली ; वर्षाकाठी 35 लाखांची कमाई झाली

Published by
Ajay Patil

Successful Farmer : शेती म्हटलं की अलीकडे अनेकजण नाक मुरडतात. शेती नको रे बाबा असा ओरडही करतात. वास्तविक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे अलीकडे शेतीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे आता नवयुवक शेतकरी पुत्र उच्च शिक्षण घेऊन चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत.

निश्चितच शेती कसने अलीकडे आव्हानात्मक बनले आहे. मात्र अशा आव्हानात्मक परिस्थितीतही योग्य नियोजन आखून काही नवयुवक शेतकरी लाखो रुपयांची कमाई करत आहेत. या नवयुवकांमुळे अनेकजण अलीकडे शेती व्यवसायाकडे आकर्षित झाले आहेत.

आज आपण वाशिम जिल्ह्यातील अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर एकरी तीन ते साडेतीन लाख रुपयांची कमाई करून दाखवली आहे. विदर्भ म्हटलं की संत्राच्या बागा आल्याचं. विदर्भातील हवामान संत्रा लागवडीसाठी अनुकूल असल्याने येथील प्रयोगशील शेतकरी संत्रा बागेतून चांगली कमाई करत आहेत.

वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील वनोजा परिसरातील गोपाल देवळे व अतुल देवळे या शेतकरी बंधूंनी आपल्या दहा एकर शेत जमिनीत संत्रा बागेची लागवड केली आहे. निश्चितच विदर्भासाठी संत्र्याचे पीक नवखे नसल्याने या शेतकऱ्यांना या पिकाच्या अगदी बारीक सारीक बाबी माहिती आहेत. परिणामी या शेतकऱ्यांना या संत्रा बागेचे व्यवस्थापन करताना कोणतीच अशी अडचण भासली नाही.

संत्रा बागेची लागवड झाल्यानंतर तज्ञ लोकांच्या सल्ल्याने तसेच आपल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करत या नवयुवक शेतकरी पुत्रांनी बागेची योग्य पद्धतीने जोपासना केली. आजच्या घडीला त्यांची 10 एकरावरील संत्रा बाग उत्पादनासाठी सज्ज झाली असून चांगल्या पद्धतीने फळधारणा झाली आहे. यामुळे त्यांना या संत्राबागेतून लाखोंची कमाई होण्याची आशा आहे.

या प्रयोगशील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना या संत्रा बागेतून 30 ते 35 लाखांची कमाई अपेक्षित आहे. सध्या स्थितीला सातशे रुपये प्रति कॅरेट असा भाव संत्र्याला मिळत असून हाच भाव कायम राहिला तर एवढी कमाई हमखास होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

निश्चितच एकीकडे मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्येचा आकडा काळीज पिळवटणारा आहे तर दुसरीकडे गोपाल देवळे व अतुल देवळे यांसारखे प्रयोगशील शेतकरी हवामानाचा योग्य अभ्यास करत, योग्य पिकांची निवड करत लाखो रुपयांची कमाई करताहेत. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्यांची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. निश्चितच या शेतकऱ्यांचे हे यश इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे यात तीळमात्र देखील शंका नाही.

Ajay Patil