स्पेशल

पॉकेटमनी, मोबाईल… आणि स्टंप, बॅट,रॉडने मारहाण ते सिनियर्सकडून छळ ! डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितल्या हॉस्टेलमधील रॅगिंग आठवणी…

Published by
Tejas B Shelar

Sujay Vikhe Ragging Experience : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे यंदाचे 24 वे वर्ष आहे. या 24 व्या वर्षाच्या व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना स्पीकर म्हणून बोलवण्यात आले होते. यावेळी सुजय विखे पाटील यांनी आपल्या शालेय जीवनाला उजाळा दिला.

यावेळी बोलताना त्यांनी, त्यांना कसा रॅगिंगचा सामना करावा लागला ? महाराष्ट्रातून असल्याने त्यांना शालेय जीवनात किती छळ सहन करावा लागला? याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. सुजय विखे पाटील यांनी सांगितलं की, मी पाचवीत असताना मला इंदोर मधील हॉस्टेलला टाकले.

पहिले दोन वर्ष मी बीपीएसला होतो. संस्था ज्यांनी स्थापन केली त्यांचाच मुलगा जेव्हा विद्यार्थी असतो तेव्हा शिक्षक कानकुच करतात. याला कसं मारायचं, कसं बोलायचं? म्हणून ते (शिक्षक) मारत होते की नाही माहित नाही. पण मी भरपूर लोकांना मारलं. म्हणून इंदूरला जाणं हा माझ्या जीवनातला मोठा बदल ठरला.

आज आपण समाजामध्ये पाहतो की रॅगिंगच्या विषयी मोठमोठे फलक लावतो. रॅगिंग इज नॉट अलाऊ असं म्हणतो. एखाद्या ज्युनिअरला विचारलं तुझं नाव काय? तर तो लगेच तक्रार करतो, की माझी रॅगिंग झाली म्हणून. पण मी जे सहन केलं ते मी आजपर्यंत कोणालाचं सांगितलं नाही पण तुम्हाला सांगतो. मी जेव्हा इंदोरला गेलो तेव्हा मी महाराष्ट्रातला एकमेव मुलगा होतो. बाकी सगळे बाहेरचे होते.

सगळे एमपीच्या वेगवेगळ्या भागातील मुलं होती. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी एकटा महाराष्ट्रातील असल्याने त्यावेळी मी माझ्या सिनियरचे रोज कपडे धुतलेत, पॅन्ट धुतल्या, चड्ड्या धुतल्या, बूट धुतलेत. मी अमाप मार खाल्ला. आमच्याकडे हाताने मारत नव्हते, स्टंप, बॅट, रोड याने मी मार खाल्ला.

मी साईबाबांना स्मरून सांगतो यातील एकही वाक्य खोटे नाही. आम्ही संध्याकाळी एका हॉलमध्ये स्टडी करायचो. पण दिवसभर दमलेले असल्याने झोप यायची. अशात आमचा सीनियर यायचा तो काय म्हणायचा? इथं फॅन चालू आहे, मी चप्पल फॅनला मारेल अन ज्याला चप्पल लागेल तो झोपायला जाईल.

मग मी प्रार्थना करायचो देवा एक चप्पल मला लागू दे. मी महाराष्ट्राचा असल्याने मला प्रचंड मनस्ताप झाला माझा छळ करण्यात आला. पण मी त्या वातावरणात वाचलो कारण मला मित्र लाभले. त्या कालावधीत मी चार मित्र कमावले.

आम्हाला रात्री कितीही हाणलं, मारलं, काहीही झालं तरी आम्ही सकाळी एकत्र यायचो अन गप्पा मारायचो. अशा प्रकारे सुजय विखे पाटील यांनी आपल्या शालेय जीवनात त्यांना रॅगिंगचा कसा सामना करावा लागला? याचा किस्सा सांगितला आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com