जिद्द, चिकाटी असेल तर मनुष्य कुठल्याही उंचीवर पोहोचू शकतो हे आपण नेहमीच ऐकले आले. कष्टातून आपण जीवन व आर्थिक उन्नती साधणाऱ्या व्यक्तीही तुम्ही पाहिल्या असतील. अशीच एक प्रेरणादायी कहाणी अहमनगर मधून समोर आली आहे.
अवघ्या १० बाय १० फूट आकाराच्या पत्र्याच्या खोलीत राहत, हालअपेष्टा सहन करत ‘तो’ शिकला.. अभियांत्रिकीच्या डिप्लोमाला पहिल्याच वर्षी काही विषयात नापास झाल्याने खचला.. पण त्यात त्याचे शैक्षणिक पालकत्व एका संस्थेने घेतले.. त्याने क्लास वन अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं.
अन् खडतर प्रवासात त्याच स्वप्न साकार झालं..तो सार्वजनिक बांधकाम खात्यात सहायक अभियंता बनला..त्याच नाव आहे बुऱ्हानगर येथील २४ वर्षीय सूरज रिमन भोसले. सूरज आई व मोठ्या बहिणीसोबत रहायचा. गावात फारशी चांगली शैक्षणिक सुविधा नसूनही त्याने दहावीत चांगले गुण मिळवले.
दहावीनंतर शासकीय महाविद्यालयात अभियांत्रिकी डिप्लोमाला प्रवेश केला. पण पहिल्याच वर्षी चार विषयांत नापास झाल्यामुळे तो खचला. त्यानंतर त्याची मोठी बहिण आरती भोसले हिने त्याला गरीब व गरजू विद्याथ्यांना मदतीचा हात ‘युवान’ संस्थेत आणलं. युवानने त्याचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.
त्याच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली. संस्थापक संदीप कुसळकर व डॉ. सचिन साळवे यांनी सुरजचे समुपदेशन केले. त्यामुळे त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करत ध्येयाकडे वाटचाल सुरु केली.
डिप्लोमाची पुढची दोन्ही वर्ष सुरज विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला.
नंतर अभियांत्रिकीची पदवीही चांगल्या गुणांनी प्राप्त केली. स्वावलंबी होत दीड वर्षे खासगी कंपनीत नोकरीही केली. नोकरी व अभ्यासाचा ताळमेळ जमत नसल्याने त्याने नोकरी सोडून पूर्ण वेळ अभ्यासाला दिला. सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत लायब्ररीत अभ्यास केला. नुकतीच त्याची सार्वजनिक बांधकाम खात्यात सहायक अभियंता म्हणून निवड झाली. त्याचा हा प्रवास नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारा आहे यात शंका नाही..