नोकरी नाही आता काय करावे? हा प्रश्न अनेक सुशिक्षित युवकांपुढे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आता जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेला पैसा मिळवण्यासाठी व्यवसाय करण्याशिवाय गत्यंतर नाही. परंतु व्यवसाय करायचा म्हटला तरी देखील पैसा हा लागतोच. पैशांची कमतरता असल्यामुळे इच्छा असून देखील बरेच जणांना व्यवसाय करता येत नाही. तसेच काही व्यक्तींकडे पैसा असतो परंतु व्यवसाय कोणता चांगला असेल हे समजत नाही.
अशा प्रकारचा गोंधळ आपल्याला सर्रासपणे आता दिसून येतो. परंतु तुमच्याकडे दोन लाख रुपये असतील तर तुम्ही सरकारच्या योजनांची मदत घेऊन व्यवसायाला सुरुवात करू शकतात व चांगल्या पद्धतीने आयुष्यात पैसा मिळवू शकतात. परंतु तुम्हाला अशा व्यवसायांची माहिती असणे देखील तितकेच गरजेचे असते. म्हणून या लेखात आपण असे व्यवसाय थोडक्यात बघणार आहोत जे तुम्हाला दोन लाखात सुरू करता येतील व आयुष्यभर लाखोत पैसे कमवता येतील.
मुद्रा योजनेचा लाभ घेऊन सुरू करा हे व्यवसाय आणि कमवा लाखोत पैसे
१) राईस आणि करी पावडर युनिट –
हा व्यवसाय देखील एक उत्तम व्यवसाय असून जर तुम्हाला राईस आणि करी पावडर मेकिंग युनिट सुरू करायचा असेल तर त्याकरिता साधारणपणे सहा लाख 55 हजार रुपये खर्च येतो. परंतु यामध्ये तुम्हाला फक्त एक लाख 66 हजार रुपये गुंतवावे लागतात व तीन लाख 32 हजार रुपये टर्म लोन आणि एक लाख 66 हजार रुपये वर्किंग कॅपिटल लोन घेणे गरजेचे असते व हे कर्ज तुम्हाला मुद्रा योजनेअंतर्गत कोणतीही बँक देते. मुद्रा योजनेच्या वेबसाईटवर अपलोड प्रोजेक्ट प्रोफाइल नुसार बघितले तर तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये एक लाख पंचेचाळीस हजाराचा फायदा होतो. या प्रकारे तुम्ही मुद्रा योजनेचा फायदा घेऊन 1 लाख 66 हजार रुपयांमध्ये हा युनिट सुरू करू शकता.
२) टोमॅटो सॉस युनिट –
जर आपण पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून बघितले तर टोमॅटो सॉस निर्मिती युनिट टाकण्याकरिता तुमच्याकडे एक लाख 95 हजार रुपये भांडवल असणे गरजेचे आहे. त्यानंतर लागणारे एक लाख 50 हजार रुपयाचे टर्म लोन आणि चार लाख 36 हजार रुपयांचे वर्किंग कॅपिटल लोन तुम्ही बँकेकडून घेऊ शकतात. एका वर्षात जर तुम्ही तीस हजार किलो टोमॅटो सॉस तयार केले तर त्याकरिता तुम्हाला प्रोडक्शन कॉस्ट 24 लाख 37 हजार रुपये येईल. हा तयार 30 हजार किलोग्राम टोमॅटो सॉस 95 रुपये किलोग्रॅमच्या बाजारभावाने जरी विकला तरी एका वर्षात तुम्ही 28 लाख 50 हजार रुपयांचा टर्नओव्हर कराल व चार लाख 12 हजार रुपयांचे उत्पन्न तुम्हाला मिळेल.
३) आयुर्वेदिक युनिट –
तुम्हाला जर आयुर्वेदिक कॅप्सूल युनिट सुरू करायचा असेल तर साधारणपणे या प्रोजेक्टची कॉस्ट 47 हजार रुपये आहे व यामध्ये तुम्ही 20 लाख कॅप्सूल तयार करू शकतात. या प्रोजेक्ट कॉस्टमध्ये शेडचे भाडे तसेच लागणारी उपकरणे आणि एक महिन्याचे वर्किंग कॅपिटल याचा समावेश करण्यात आलेला आहे. या प्रोजेक्ट करिता तुम्हाला पंतप्रधान रोजगार योजनेचे कर्ज मिळू शकते व प्रोजेक्ट सुरू झाल्यावर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जवळपास 11 लाख 72 हजार रुपये इतके असते. तसेच तुमची विक्री 15 लाख रुपये असेल म्हणजेच तुम्ही तीन लाख 28 हजार रुपये या माध्यमातून नफा मिळवू शकतात. पंतप्रधान रोजगार योजनेच्या माध्यमातून तुम्ही कर्ज मिळवून तुमच्या जवळील एक लाख दहा हजार रुपये टाकून हे युनिट तुम्ही सुरू करू शकतात.