Marathi News : अमेरिकन अब्जाधीश आणि टेक टायकून ब्रायन जॉन्सन मृत्यूला चकवा देण्यासाठी खास गोष्टी खात आहेत. त्यांनी अमर राहण्यासाठी विशेष आणि आश्चर्यकारक डाएट प्लॅन केला असून हा प्लॅन त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या उपायांनी त्यांचे वय पाच वर्षांनी कमी झाल्याचा दावाही त्यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या जगात कोणीही अमर नसतो, ही म्हण सर्वश्रुत आहे. जो कोणी या पृथ्वीतलावर आला आहे, त्याला एक ना एक दिवस जायचेच आहे. पण ब्रायन जॉन्सन या व्यक्तीला निसर्गाचा हा नियम उलटवायचा आहे. त्यांना कधीच मरायचे नाही. गेल्या तीन वर्षांत त्यांनी ते सिद्ध केले असून त्यांनी आपले वय १८ वर्षांनी कमी केल्याचा दावाही केला आहे.
वृद्धत्व टाळण्यासाठी ते काय खातो. कोणते उपचार घेतो, याबद्दलची आश्चर्यकारक माहिती ब्रायन जॉन्सन यांनी शेअर केली आहे. जॉन्सन त्यांचे जैविक वय उलट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना नेहमी तरुण दिसायचे असून कधीही मरायचे नाही, त्यामुळे त्यांनी मृत्यू टाळण्यासाठी नियोजित केलेल्या आहाराची आणि जीवनशैलीची माहिती त्यांच्या यूट्यूब व्हिडीओमध्ये सांगितली आहे,
आश्चर्याची बाब म्हणजे अमर होण्यासाठी ते रोज चॉकलेट खातात. यासंबंधीच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, कधी कधी ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नसतात, त्या आपण करीत नाही. पण काही गोष्टींचे फायदे खूप जास्त असतात; चॉकलेट त्यापैकीच एक असल्याचे नमूद केले आहे.
४५ वर्षीय ब्रायन जॉन्सन यांनी चॉकलेटचे शरीरासाठी फायदे सांगताना, जर तुम्ही रोज चॉकलेट खाल्ले तर तुमचा मेंदू निरोगी राहील, असा दावा केला असून काम करण्याची क्षमता, स्मरणशक्ती मजबूत होऊन हृदयही चांगले काम करेल, असा चमत्कारीक दावाही जॉन्सन यांनी केला आहे.
परंतु स्टोअरमध्ये असलेली सर्व चॉकलेट्स फायदेशीर नसल्याचेही जॉन्सन यांनी स्पष्ट केले असून जर तुम्ही उच्च दर्जाचे चॉकलेट खाल्ले तर तुम्हाला अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. सर्वप्रथम ते शुद्ध असावे. दुसरे म्हणजे, त्यात जड धातूंचे परीक्षण असावे. तिसरे, ते उघडे नसावे आणि चौथे, त्यात उच्च फ्लेव्होनॉल असावे.
तुम्ही ते स्टोअर किंवा सुपर मार्केटमधून विकत घेतले तरीही ते उच्च दर्जाचे असले पाहिजे, असेही जॉन्सन यांनी स्पष्ट केले आहे. जॉन्सन त्यांच्या वृद्धत्वविरोधी पॅशनसाठी ओळखले जातात. एखाद्याला अमर बनवणारे औषध विकसित करण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रकल्पाच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.