Business Success Story:- जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर सगळ्यात अगोदर एखादे ध्येय ठरवणे गरजेचे असते. नंतर मात्र ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करत करत ठरवलेल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी लागते.
या वाटचालीमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात व कधीकधी ध्येयाच्या मार्गावरून परत फिरावे असे वाटायला लागते. परंतु कितीतरी अडचणी आल्या तरी त्या अडचणीवर मात करत पुढे रस्ता मोकळा करत ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी लागते व जो अशा पद्धतीने ध्येयाचा पाठलाग करतो तो व्यक्ती नक्कीच यश संपादन करतो.
अगदी हाच मुद्दा जर आपल्याला एखाद्या उदाहरणाने समजून घ्यायचा असेल तर आपल्याला चंद्रशेखर मंडल यांचे घेता येईल. त्यांनी गवंडी तसेच सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि पेंटर इत्यादींना काम मिळावे किंवा त्यांना काम शोधण्यामध्ये मदत व्हावी अशा प्रकारची वेबसाईट सुरू केली व त्या माध्यमातून कामगारांना काम मिळणे सोपे झाले परंतु स्वतः देखील त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक समृद्धी मिळवली आहे.
चंद्रशेखर मंडल यांची यशोगाथा
चंद्रशेखर मंडल हे मूळचे बिहार राज्यातील असून दरभंगा जिल्ह्यातील अमी या गावचे रहिवासी आहेत. जेव्हा त्यांचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा 2020 मध्ये त्यांनी बँकेत नोकरी पत्करली व नोकरी करायला सुरुवात केली. एकदा असेच चंद्रशेखर हे ऑफिसमध्ये बसलेले असताना चौकातील मजुरांना त्यांनी पाहिले.
हे मजूर दैनंदिन काम मिळावे यासाठी कामाची वाट पाहत त्या ठिकाणी बसलेले होते. त्या ठिकाणी बसलेल्या मजुरांची स्थिती पाहून त्यांना खूप वाईट वाटले. त्यातल्या त्यात मार्च 2021 मध्ये कोविडमुळे लॉकडाऊन होता व अनेक मजूर बेरोजगार झालेले होते.
हीच गोष्ट चंद्रशेखर यांनी डोक्यात घेतली व मजुरांसाठी व त्यांना रोजगार मिळावा यासाठी काहीतरी करावी असे ठरवले. त्यानंतर मात्र त्यांनी नोकरी सोडली आणि अमी त्यांच्या मूळ गावी परत आले. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 40 हजार रुपये होते. अशातच त्यांनी व्यवसायाला सुरुवात करायचे ठरवले.
अशाप्रकारे केली व्यवसायाला सुरुवात
कामगारांना किंवा मजुरांना फायदेशीर होईल असे एक ॲप लॉन्च करावे अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. या ॲपमुळे कामगारांना दररोज चौकात कामाच्या शोधात किंवा कामाची वाट पाहण्यात बसण्याऐवजी त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून काम शोधता येईल अशी सोय त्या माध्यमातून केली.
परंतु असे एप्लीकेशन तयार करण्यासाठी पैसा हवा होता व त्याकरिता त्यांनी सरकारी योजना किंवा कुठून कर्ज मिळेल का याची चाचपणी सुरू केली. याकरिता सरकारच्या प्रधानमंत्री रोजगार योजना आणि मुद्रा योजनेचा आधार घ्यायचे त्यांनी ठरवले. या योजनांमधून त्यांना पैसा मिळाला नाही.
परंतु हिम्मत न हारता त्यांनी पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले व अखेर पुण्यातील एका इंक्युबेटरने त्यांच्या प्रकल्पासाठी 10 लाख रुपयांची मदत त्यांना देऊ केली. पुढे त्यांनी हिताची इंडिया आणि केरळ स्टार्टअप मिशनच्या उपक्रमांच्या नॅशनल इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभाग नोंदवला त्या ठिकाणी त्यांची व्यवसाय कल्पना निवडली गेली व त्या ठिकाणी तीस लाखांचा सीड फंड मिळाला व तेथून त्यांचा प्रवास सुरू झाला.
या सगळ्या कष्टातून त्यांनी मार्च 2023 मध्ये डिजिटल लेबर चौक नावाचे एप्लीकेशन लॉन्च केले. या डिजिटल लेबर चौक एप्लीकेशन च्या माध्यमातून आज भारतातील हजारो कामगारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
अतिशय कष्टाने चंद्रशेखर यांनी इथपर्यंत प्रवास पूर्ण केला व यामुळे इतर व्यक्तींना खूप मोठा फायदा झाला. चंद्रशेखर यांच्या या एप्लीकेशन मुळे हजारो मजुरांना आज काम मिळत असून या एप्लीकेशनच्या मदतीने नोकऱ्यांच्या लाभ देखील कामगारांना घेता येत आहे.
लेबर डिजिटल चौक एप्लीकेशन कसे करते काम?
या एप्लीकेशनच्या कामाची पद्धत पाहिली तर यामध्ये अनेक व्यावसायिक त्यांच्या व्यवसायाची नोंदणी या एप्लीकेशन वर करतात. नोकरीची आवश्यकता असलेल्या पोस्ट या एप्लीकेशन वर केल्या जातात व ॲप वर पैसे देतात.
जेव्हा या ॲप्लिकेशनवर नोकरीबद्दल जाहिरात किंवा एखादी सूचना टाकली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना त्याचे नोटिफिकेशन मिळते व अशा पद्धतीने कामगारांना काम या एप्लीकेशनच्या माध्यमातून मिळते.