Marathi News : पाताळाचे द्वार म्हणून ओळखले जाणारे रशियाच्या सायबेरियामधील जगातील सर्वात मोठे पर्माफ्रॉस्ट बटागायका विवर दिवसेंदिवस मोठे होत आहे. हे बटागायका विवर गोठलेली जमीन वितळल्यामुळे दरवर्षी ३५ दशलक्ष घनफूटने विस्तारत आहे.
रशियातील उत्तर याकुतियाच्या याना अपलँडमध्ये १९९१ मध्ये टेकडी कोसळल्यानंतर बटागायका विवर प्रथमच दिसले. टेकडीचा एक भाग कोसळल्याने ६ लाख ५० हजार वर्षांपासून गोठलेले पर्माफ्रॉस्टचे स्तर उघड झाले.
हे सायबेरियातील सर्वात जुने पर्माफ्रॉस्ट आहे. पर्माफ्रॉस्ट वितळल्यामुळे बटागायका मेगास्लम्पचा मुखदर्शनी खडकाळ टेकडीचा भाग दरवर्षी ४० फूट वेगाने मागे सरकत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले आहे.
हा टोकाचा भाग १८० फूट खाली कोसळला असून हा कोसळलेला भाग वेगाने वितळून बुडत आहे. तसेच बर्फ आणि गाळाचे प्रमाणही कमी झाल्याचा अहवाल संशोधन पथकाने दिला आहे.बटागायका मेगास्लम्पची रुंदी २०१४ मध्ये, २६०० फूट मोजली गेली.
त्यानंतर गेल्या दहा वर्षांत ते ६६० फूट रुंद राहिले आहे. विशेष म्हणजे पर्माफ्रॉस्ट वितळत असल्याचे बटागायका विवरही विस्तारत असल्याचे संशोधकांना आधीच माहित होते, परंतु त्यांनी प्रथमच विवरातून वितळलेल्या सामग्रीचे प्रमाण निश्चित केले आहे.
सॅटेलाइट इमेज, क्षेत्रीय सर्वेक्षण आणि डाटा निरीक्षणातून बटागायकाची पाहणी करून समोर आलेल्या निष्कर्षाने संशोधकांनीही चिंता व्यक्त केली आहे. या संशोधनातून असे दिसते की, गिझाच्या १४ पेक्षा जास्त ग्रेट पिरामिड्सच्या समतुल्य बर्फ आणि गाळाचे क्षेत्र मेगास्लम्प कोसळल्यानंतर वितळले आहे. हा वितळण्याचा दर गेल्या दशकात तुलनेने स्थिर असून वितळण्याची ही क्रिया प्रामुख्याने विवराच्या पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय बाजूंच्या हेडवॉलच्या बाजूने होत आहे.
त्यामुळे सायबेरियातील पर्माफ्रॉस्ट क्रेटर बटागायका वितळण्यावर आणि विस्तारावर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. अलीकडेच रशियन शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या उत्तर आणि ईशान्येकडील शहरांसह अन्य शहरांनाही या पर्माफ्रॉस्ट क्रेटर वितळण्याचा धोका असून केवळ रशियन शहरांसाठीच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीसाठी हा मोठा धोका आहे. कारण विवर वितळल्यामुळे मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कार्बन वातावरणात मिसळत असल्याने ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे.
अंतराळ संस्था नासाच्या मते, पर्माफ्रॉस्ट म्हणजे जमीन किंवा जागा जी कमीत कमी सलग दोन वर्षे शून्य अंश सेल्सिअसवर पूर्णपणे गोठलेली असते. ही कायमस्वरूपी गोठलेली मैदाने माती, खडक आणि बर्फाने एकत्र ठेवलेल्या वाळूच्या मिश्रणाने बनलेली असतात.
अशी पर्माफ्रॉस्ट उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळील भागात सर्वसामान्य असून त्यांनी पृथ्वीचा मोठा भाग व्यापला आहे. विशेषतः उत्तर गोलार्धात, सुमारे एकचतुर्थांश भूभाग पर्माफ्रॉस्टने व्यापलेला आहे. जरी जमीन गोठलेली असली तरी पर्माफ्रॉस्टचे क्षेत्र नेहमी बर्फाने झाकलेले नसते, असेही नासाने स्पष्ट केले आहे.