राज्यामध्ये जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली होती व त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी आणि उन्हाळी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या कालावधीमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांचा प्रभावामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले व शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला होता.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या नुकसानी पोटी सरकारकडून मदतीची मागणी करण्यात येत होती व सरकारने पंचनामाच्या आदेश देऊन झालेल्या नुकसानाचे पंचनामे देखील केले होते. परंतु सहा महिने लोटले तरी देखील या नुकसानीची कुठल्याही प्रकारची भरपाई शेतकऱ्यांना मात्र मिळालेली नव्हती. या बाबत पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी आवाज उठवला होता व सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर राज्याचे आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी 15 जुलै पर्यंत अतिवृष्टी आणि अवकाळीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु 2 ऑगस्ट रोजी या संबंधीचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने निधी वाटपाला दिली मंजुरी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्यात जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये बऱ्याच भागात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने थैमान घातले होते व शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून निधी मागणीचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते व त्या अनुषंगाने आता राज्य सरकारने यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीकरिता निधी वाटपाला मंजुरी दिली असून यासाठी 596 कोटी 21 लाख 55 हजार इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
त्यामुळे जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये अवकाळी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी पोर्टलवरून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश देखील राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.
किती मिळणार नुकसान भरपाई ?
नुकसान भरपाई मिळण्यासाठी अगोदर दोन हेक्टरचे मर्यादा होती व त्यामध्ये आता वाढ करण्यात येऊन ती तीन एकर करण्यात आली आहे व महत्त्वाचे म्हणजे तसा उल्लेखच शासन निर्णयात करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेपर्यंत निधी मिळणार असून यामध्ये जिराईत पिकांसाठी प्रतिहेक्टर 13 हजार 600 रुपये, बागायत पिकांकरिता 27 हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार रुपये प्रतिहेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित मिळणार आहेत.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल मदत
ही मदत प्रामुख्याने नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार तसेच पुणे विभागातील पुणे, सोलापूर, अमरावती विभागातील अमरावती, अकोला तसेच यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नागपुरी भागातील गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश यामध्ये आहे. म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या माध्यमातून मिळणार आहे. त्यामध्ये काही जिल्ह्यात जानेवारी महिन्यामध्ये अवकाळी पावसाने नुकसान केले होते तर काही जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते व या जिल्ह्यांसाठीच ही मदत देण्यात आलेली आहे.