स्पेशल

राज्यातील ‘या’ ठिकाणी होणार पहिला डबल डेकर पूल! एकाच पुलावर वर मेट्रो आणि खाली धावणार वाहने, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

राज्यामध्ये पायाभूत विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक रस्ते प्रकल्प तसेच मुंबई व पुण्यासारख्या शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांची कामे प्रगती पथावर आहे. दोन शहरांमधील कनेक्टिव्हीटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुंबई व पुण्यासारख्या शहरांमधील वाहतूक कोंडीचे समस्या सोडवण्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प खूप महत्त्वाचे असून औद्योगिक व प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून देखील या प्रकल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण असणार आहे.

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून अनेक प्रकारचे पूल या मार्गावर उभारण्यात येत आहेत.

याच प्रकारे जर आपण वसईतील मेट्रो मार्गाचा विचार केला तर या मार्गावर भाईंदर खाडीमध्ये राज्यातील पहिला डबल डेकर पूल तयार केला जाणार असून या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या एकाच खांबावर वर मेट्रो रेल्वे आणि खाली वाहनांसाठी पूल असणार आहे. विशेष म्हणजे हा राज्यातील पहिला अशा प्रकारचा पूल असणार आहे.

 भाईंदर खाडीत होणार राज्यातील पहिला डबल डेकर पूल

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाईंदर खाडीमध्ये राज्यातील पहिला डबल डेकर पुलाची उभारणी केली जाणार असून यामध्ये एकाच खांबावर वर मेट्रो रेल्वे आणि खाली वाहनांसाठी पुलाची उभारणी केली जाणार आहे. या कामाला एमएमआरडीसीच्या माध्यमातून मान्यता देखील देण्यात आलेली असल्यामुळे आता वसईतील मेट्रो मार्गाचा खर्च देखील कमी होणार आहे.

वसई शहरांमध्ये मेट्रो यावी याकरिता मेट्रो मार्ग १३ ची घोषणा करण्यात आलेली होती व तेव्हाच मीरा-भाईंदर ते वसई विरार हा मेट्रो मार्ग एकमेकांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. मीरा रोड ते विरार हा 23 किलोमीटरचा मेट्रो मार्ग असून त्यामध्ये 20 स्थानकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

जरी वसई विरार शहरांसाठी मेट्रो प्रकल्पाला मान्यता मिळालेली असली तरी या मार्गात खाडी असल्यामुळे मेट्रो नेमकी कुठून आणायची असा मोठा प्रश्न होता. याकरता अनेक पर्यायांची चाचपणी देखील सुरू होती. पर्यायांचा विचार करत असताना अनेक इतर पर्यायी मार्ग हे खर्चिक आणि वेळखाऊ असल्यामुळे ते टाळून भाईंदर खाडीवरील प्रस्तावित पुलावरून मेट्रो आणावी असा प्रस्ताव आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिलेला होता

व  या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आमदार क्षितिज ठाकूर आणि आमदार राजेश पाटील यांनी केला होता व अखेर एमएमआरडीसीच्या झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला आता मान्यता देण्यात आलेली आहे. सध्या भाईंदर नायगाव मेट्रो सहित खाडी पूल उभारण्याबाबतचा आराखडा तयारीचे काम सध्या सुरू आहे व या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे.

भाईंदर वसई पुलाचा आराखडा आणि स्ट्रक्चरल डिझाईन प्राधिकरणाच्या दळणवळण विभागाकडे देण्यात आला आहे व वसई खाडीवर मेट्रो सहित खाडी पुलाच्या कामाच्या प्रस्तावाची कार्यवाही आता प्रगतीपथावर आहे अशी देखील माहिती समोर आलेली आहे.

 मेट्रो प्रकल्पाच्या खर्चामध्ये होणार बचत

मीरा भाईंदर या शहरांमध्ये सध्या मेट्रो मार्गाचे काम चालू असून त्याचं मार्गाला हा वसई विरार मेट्रोमार्ग जोडला जाणार आहे. या मार्गावर भाईंदर खाडीत आता हा प्रस्तावित पुल आणि मेट्रो एकाच ठिकाणहून जाणार आहे.

पुलावर वर मेट्रो आणि खाली वाहनांसाठी पूल असणार अशी रचना करण्यात येणार आहे व एकाच खांबावर हे दोन्ही मार्ग असणार आहेत. त्यामुळे या मेट्रो प्रकल्पाच्या खर्चात देखील बचत होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Ajay Patil