पंतप्रधानांनी जाहीर केली प्रजासत्ताक सोहळ्याची नवी तारीख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठा निर्णय घेतला आहे. देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासून सुरू होईल.

स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी 23 जानेवारीला येते हे लक्षात घेऊन सरकारने आता प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

माहितीनुसार, मोदी सरकारचा हा निर्णय भारताच्या इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित मोठ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ घेण्यात आला आहे.

दरम्यान भाजप सरकारने यापूर्वीच अनेक तारखांना राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस म्हणून घोषित केले आहे. यामध्ये 14 ऑगस्ट हा फाळणी स्मृती दिन, 31 ऑक्टोबर सरदार पटेल यांचा जयंती राष्ट्रीय एकता दिवस, 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन आणि 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

तसेच देशातल्या स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली.

जे स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावत आहेत, त्या सर्व स्टार्टअप उद्योजकांचे, तसेच कल्पक तरुणांचे पंतप्रधानांनी यावेळी अभिनंदन केले.