शुभकार्यासाठी आलेल्या त्या महिलांचा दुर्दैवी मृत्यू; विहिरीत पडून १३ जणांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास १३ महिला विहिरीत पडल्याची घटना घडली.

या घटनेत आतापर्यंत सुमारे १३ महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. एका हळदी समारंभासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक जमले असतानाच विहिरीवरील जाळी तुटून अनेक जण त्यात कोसळले व त्यातील किमान १३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून मदत आणि बचावकार्य तत्काळ सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जखमींवर वेगवान उपचार होतील यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे, असेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. अधिक माहिती अशी की, नौरंगिया शाळेच्या मैदानात एका लग्नाचा कार्यक्रम सुरू होता.

बुधवारी या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काही महिला आणि मुली विहिरीवर लावलेल्या जाळीवर उभ्या होत्या.

त्याचवेळी हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि काही महिला जाळीवर चढल्याने महिलांच्या वजनाने लोखंडी पातळ जाळी तुटली. त्यामुळे या जाळीवर उभ्या असलेल्या सर्व महिला एकापाठोपाठ एक करून विहिरीत कोसळल्या.

एकूण १३ महिला या विहिरीत कोसळल्या. त्यात दोन मुलींचाही समावेश होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. विहिरीतून महिलांचा किंचाळण्याचा आवाज येते होता.

मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आणि स्थानिकांनी या महिलांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत १३ महिलांचा बुडून मृत्यू झाला.