स्पेशल

या पठ्यांनी तर कमालच केली! ऑफ सीजन कलिंगडची लागवड करून मिळवले तब्बल 4 लाखांचे उत्पन्न; असे केले नियोजन

Published by
Ajay Patil

आजकालचे तरुण शेतीमध्ये येऊ लागल्याने आता शेतीमध्ये तंत्रज्ञानाचे वारे मोठ्या प्रमाणावर वाहू लागले आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करून ही तरुण मंडळी असे प्रयोग यशस्वी देखील करत आहेत. पारंपारिक शेतीची पद्धत आणि पारंपारिक पिके यांना पूर्णपणे वेगळे करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला आणि फळ पिकांच्या माध्यमातून आताचे तरुण मंडळी शेतीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती करत आहे.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात असलेल्या केत्तुर नं.2 या गावचे तरुण शेतकरी विनोद नवले आणि रणजीत नवले या तरुणांची यशोगाथा बघितले तर ती काहीशी इतर तरुणांना खूप प्रेरणा देणारी अशीच आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या या तरुण शेतकऱ्यांनी  आंतरपीक म्हणून बिगर हंगामी कलिंगड पिकाची लागवड केली व त्या माध्यमातून लाखो रुपयांचा नफा कमवला आहे. म्हणजे जे शेतकऱ्यांना हंगामात शक्य होत नाही ते या शेतकऱ्यांनी बिगर हंगामी कलिंगडातून शक्य करून दाखवलेले आहे.

 बिगर हंगामी कलिंगडाची केली आंतरपीक म्हणून लागवड

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात असलेल्या केतुर नं.2 या गावचे विनोद आणि रणजीत नवले हे दोघे तरुण यूपीएससीची तयारी करत होते व ही तयारी करत असतानाच त्यांनी शेतीमध्ये येऊन काहीतरी वेगळे करावे असे ठरवले व अनेक प्रयोग करायला सुरुवात केली व ते प्रयोग यशस्वी देखील केले.

त्यांनी असाच एक प्रयोग दोन एकर पेरू बागेमध्ये करायचा ठरवला व दोन एकर पेरू बागेमध्ये आंतरपीक म्हणून बिगर हंगामात कलिंगड लागवड करण्याचे ठरवले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कलिंगडचा जो काही हंगाम असतो तो जून महिन्याच्या आधीच संपल्यात जमा होतो.

परंतु या दोघांनी 25 मे रोजी पेरू बागेच्या दोन ओळींमध्ये एक कलिंगडासाठी बेड तयार करून त्या ठिकाणी कलिंगडाची लागवड केली. हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला व त्यात दोन एकर आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या कलिंगडाचे त्यांना 33 टन उत्पादन मिळाले.

 अशाप्रकारे केली लागवड आणि खताचे व्यवस्थापन

त्यांनी कलिंगड लागवड करण्याचे निश्चित केले व सिंबा या कलिंगड वाणाची 25 मे ला लागवड केली. कारण या वाणाला पावसाळ्यामध्ये चांगला लाल रंग येतो आणि आकार देखील चांगला वाढतो. पेरूच्या बागेत आंतरपीक म्हणून लागवड करत असताना पेरूच्या दहा फूट अंतरावरील दोन ओळींमध्ये एक बेड तयार करून त्यावर सव्वा फुटावर ही कलिंगड लागवड त्यांनी केली.

तसेच लागवड केल्यानंतर खत व्यवस्थापन करताना जेव्हा त्यांनी कलिंगडाची रोपे लावली तेव्हा त्यानंतर ह्युमिक ऍसिड आणि 19:19:19 या खतांची आळवणी करून घेतली व दुसरी आळवणीला बुरशीनाशक व कीटकनाशकांचा वापर केला. तसेच या कलिंगडासाठी बेसल डोस भरताना त्यांनी एका एकर साठी एक बॅग युरिया,24:24:00,

स्मार्ट मिल सेंद्रिय खताच्या चार बॅग तसेच 10:26:26 या खताच्या दोन बॅग व सूक्ष्म अन्नद्रव्य,घरी बनवलेले गांडूळ खताचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. तसेच पोटॅशियम शोनाइट कॅल्शियम,

मॅग्नेशियम व बोरॉन सारखी खते देखील ड्रिप मधून दिली. तसेच 12:61, 00:52:34 यासारख्या खतांचा वापर देखील व्यवस्थित केला. तसेच गरज पाहून चार ते पाच दिवसाच्या अंतराने फवारण्या देखील घेतल्या. विशेष म्हणजे कलिंगडासाठी जे सर्व खते दिली त्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन आणि एचटीपीच्या वापर करून त्याच्या साह्याने ही खते कलिंगडाला दिली.

 अशाप्रकारे केले ऑफ सीजनमध्ये कलिंगडाची विक्री व्यवस्थापन

ऑफ सीजनमध्ये कलिंगडाची लागवड करण्या अगोदरच त्यांनी पुणे तसेच वाशी सारख्या बाजारपेठेला भेट देऊन दरांचा अंदाज घेतलेला होता. याकरिता कलिंगडाच्या व्यापाऱ्यांशी संपर्क करून मार्केटमधील दरांचा अंदाज घेतला व त्यानुसार लागवड व संपूर्ण विक्रीची व्यवस्थापन केले.

विशेष म्हणजे ऑफ सीजनमध्ये देखील त्यांच्या शेतातूनच कलिंगडाची विक्री केली व दर देखील 13 रुपये प्रतिकिलो मिळाला. लागवडीनंतर 52 दिवसांमध्ये त्यांच्या कलिंगडची तोडणी सुरू झाली व  व्यापाऱ्यांनी जागेवरूनच या कलिंगडची खरेदी केली व 13 रुपये किलो प्रमाणे दर मिळाला.

यामध्ये त्यांना दर्जेदार स्वरूपाचा 30 टन माल मिळाला. या सगळ्या मधून त्यांना चार लाख वीस हजारांचे उत्पन्न मिळाले व त्यांचा एक लाख तीस हजारांचा खर्च वजा करता दोन लाख 90 हजार रुपयांचा निव्वळ नफा त्यांच्या हाती लागला.

Ajay Patil