स्पेशल

Farmer Success Story: आष्टीच्या ‘या’ शेतकऱ्याने अशा पिकाची केली लागवड की 30 गुंठ्यामध्ये मिळवले 2 लाख रुपयांचे उत्पन्न

Published by
Ajay Patil

Farmer Success Story:- जसा जसा काळ बदलत आहे तसा तसा आता शेती क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. परिस्थितीनुसार माणसाने बदलले पाहिजे किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये बदल हा केला गेला पाहिजे हे तत्व शेती क्षेत्रामध्ये आता प्रकर्षाने लागू केले जात आहेत व या बदलाचे सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत.

शेती क्षेत्रातील बदल जर पाहिले तर ते प्रामुख्याने पीक लागवडीच्या संदर्भात असून यामध्ये वेगवेगळ्या पिकांचे यशस्वी प्रयोग शेतकरी करत असून त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये मिळवत आहे.

तसेच सोबत तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने देखील खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे चित्र आहे. अगदी नवीन पीक पद्धतीचा किंवा नवनवीन पिकांचा प्रयोगाच्या बाबतीत बघितले तर आष्टी परिसरातील तरुण आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे सुनील पाटील यांनी चायनीज झुकीनी या विदेशी भाजीपाला पिकाची लागवड करून अवघ्या साठ दिवसांमध्ये लाखो रुपयांची कमाई करण्यामध्ये यश मिळवलेले आहे.

 झुकीनी पिकातून सुनील पाटील यांनी घेतले लाखो रुपयांचे उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की आष्टी येथील प्रगतिशील शेतकरी सुनील पाटील यांनी झुकिनी पिकाची लागवड केली व या पिकाच्या माध्यमातून 60 दिवसात लाखो रुपयांची कमाई केलेली आहे. सुनील पाटील हे एका पतसंस्थेमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून नोकरी करत असतानाच त्यांना शेतीची आवड असल्यामुळे ते शेतीमध्ये देखील वेगवेगळ्या पिकाचे प्रयोग करत असतात व याच प्रयोगांचा भाग म्हणून काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने त्यांनी तीस गुंठ्यामध्ये झुकीनी पिकाची लागवड केली.

लागवड करण्याचे निश्चित केल्यानंतर पूर्व मशागतीसाठी शेतीची उभ्या आणि आडवी नांगरट करून शेणखत पसरवून घेतले व साडेचार फुटावर बेड तयार करून मल्चिंग पेपर अंथरले व पाणी व्यवस्थापनासाठी ठिबकचा वापर केला. तसेच बेसल डोस देऊन सुमारे अडीच फुटावर झुकीनीचे बियाणे ऑगस्ट मध्ये टोकन पद्धतीने लावले.

तसेच गरजेनुसार ठिबकच्या साह्याने पाणीपुरवठा आणि दिवसाआड रासायनिक खते ठिबक मधून दिली व लागवडीनंतर 35 ते 40 दिवसानंतर त्यांना झुकिनीचे उत्पादन आता मिळायला लागले असून हे फळांची विक्री ते मुंबई येथील दादर मार्केट तसेच हैदराबाद, गोवा आणि पुणे या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेमध्ये करत आहेत.

या झुकीनीला बाजारपेठेमध्ये दहा रुपयापासून ते शंभर रुपयांपर्यंत दर मिळत असून पाटील यांना 30 गुंठ्यात 50 किलो ते 300 किलो पर्यंत उत्पादन मिळते. 30 गुंठ्यामध्ये सरासरी सहा ते सात टन उत्पन्न मिळते व सरासरी 25 ते 30 रुपये दर मिळत असून यामुळे त्यांना दोन लाखापर्यंत उत्पादन मिळणार आहे.

त्यासाठी दोन ते अडीच महिन्यात 70 ते 80 हजार रुपये खर्च आला असून हा खर्च वजा केला तरी एकरी सव्वा लाख रुपयांचे उत्पादन पाटील यांना मिळणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil