शेती व्यवसायाशी निगडित असलेले पूरक व्यवसाय म्हणजे जोडधंदे पाहिले तर संपूर्ण भारतामध्ये पूर्वापार पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो व त्या खालोखाल शेळीपालन तसेच कुकूटपालन या व्यवसायांचा नंबर लागतो. परंतु या व्यतिरिक्त आता बटेरपालन तसेच वराह पालन, ससेपालन आणि खेकडापालन देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी करू लागलेले आहेत. जर गेल्या काही वर्षापासून आपण बघितले तर हवामान बदलाचा प्रचंड प्रमाणात फटका शेती क्षेत्राला बसत असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते व अशावेळी पूरक व्यवसाय शेतकऱ्यांना आधार देतात. अगदी याच पद्धतीने आपण पुणे जिल्ह्यातील मेंगाळवाडी येथील शांताराम वारे या शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने बाजारपेठेतील स्थानिक मागणी आणि संधी ओळखून खेकडापालन व्यवसायाला सुरुवात केली व त्या माध्यमातून आज आर्थिक समृद्धी देखील ते मिळवत आहेत.
खेकडापालन व्यवसाय ठरला फायद्याचा
शेतीमधून होत असलेले प्रचंड आर्थिक नुकसान पाहता पुणे जिल्ह्यातील मेंगाळवाडी येथील शांताराम वारे या शेतकऱ्याने खेकडापालन व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यांच्याकडे एकूण 94 गुंठे शेती आहे व त्यामध्ये ते कांदा तसेच सोयाबीन इत्यादी पिके घेतात. परंतु या शेतीला काहीतरी पूरक व्यवसायाची जोड द्यावी म्हणून ते विचारात असताना परिसरातील मागणी आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी खेकडा पालन या व्यवसायाची निवड केली. खेकडांना स्थानिक नागरिक तसेच खवय्ये व काही रुग्णांकडून देखील मागणी असते व त्यासोबत गोड्या पाण्यातील काळ्या पाठीचा खेकडा बाजारामध्ये मिळत नाही.
हीच गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी खेकडा पालन व्यवसायाला सुरुवात केली. खेकडा पालन व्यवसायासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत त्यांनी खेकडा पालन व्यवसायाला सुरुवात केली व आज सहा वर्षांमध्ये त्यांनी खेकडा पालन व्यवसायामध्ये संपूर्ण कौशल्य आत्मसात केलेले आहे. याकरिता व्यवस्थापन करताना त्यांनी वीस बाय पंधरा फूट लांबी रुंदी व चार फूट खोल टाकी बनवली व बाजूला असलेल्या पंधरा बाय सहा फूट आकाराच्या छोट्या टाकीत पाणी भरून ठेवण्यात येते. या टाकीतून मुख्य टाकीत पाणी सोडले जाते व खेकडा पालन केले जाते.
खेकडा पालनासाठी जी मुख्य टाकी उभारली आहे तिच्या तळाला माती आहे व खेकड्यांना आसरा मिळावा म्हणून मातीच्या कुंड्या आणि पाण्यात वाढणारे गवत देखील आहे. परंतु यामध्ये काही वेळेस खेकड्यांची वाढ होत नव्हती किंवा मरतूक होत होती. म्हणून त्यांनी एक एक गुंठा क्षेत्रावर तीन तळी घेत त्यामध्ये आता खेकडापालन व्यवसाय सुरू केला आहे. याकरिता लागणारे छोटे खेकडे व पिले ते जे व्यक्ती पिंजऱ्यात खेकडे पकडतात त्या व्यक्तीकडून विकत घेतात. आपण खेकड्याच्या मादीचा विचार केला तर ती एक मादी 500 ते 1000 पिले देते त्यामुळे खेकड्यांचे पैदास मोठ्या प्रमाणावर होते. खेकडा विक्री योग्य होण्यासाठी साधारणपणे एक वर्षाचा कालावधी लागतो व प्रती खेकड्याचे वजन 500 ग्रॅम पर्यंत असते. अशा प्रकारे चार ते पाच खेकड्यांचे वजन एक किलोच्या आसपास भरते व खाद्य म्हणून त्यांना आठवड्यातून एकदा छोटे मासे देखील खायला देण्यात येतात.
या पद्धतीने करतात विक्री व व्यवस्थापन
सोशल मीडियाचा चांगला वापर विक्री व्यवस्थापनासाठी त्यांनी केला असून फेसबुक आणि युट्युब इत्यादीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या व्यवसायाचे प्रमोशन आणि मार्केटिंग केलेली आहे. तसेच त्यांच्या गावाजवळचा जुन्नर व इतर भागात पर्यटनासाठी देखील उत्तम असल्याने त्या ठिकाणी पर्यटक कायम येत असतात व याचा देखील फायदा त्यांना व्यवसायासाठी चांगला होतो. त्यांनी रस्त्याच्या बाजूला त्यांच्या घराजवळ एक छोटेसे हॉटेल देखील सुरू केलेली आहे व त्यामध्ये खेकडा रस्सा, खेकडा फ्राय तसेच खेकडा सूप,खेकडा भाजी असे पदार्थ बनतात. या हॉटेलमध्ये रेट पाहिले तर प्रती ताट दोनशे रुपये तर अन्य पदार्थ 50 ते 150 रुपये अशा दराने विक्री होत असते.पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांची संख्या जास्त असते व आतापर्यंत त्यांनी अनेक ग्राहक जोडले आहेत.
एवढेच नाहीतर ते खेकड्यापासून तेल निर्मिती देखील करतात. ज्या प्रमाणे काळ्या पाठीचा खेकडा खायला चवदार असतो व त्यापासून तेल देखील चांगले मिळते. या व्यवसायातून वर्षभर त्यांना पैसा मिळेल अशा पद्धतीने त्यांनी व्यवस्थापन केले असून त्यामुळे तेल निर्मितीच्या माध्यमातून देखील त्यांना चांगला पैसा मिळतो. प्रतिकिलो खेकड्यापासून शंभर मिली तर दरम्याला पाचशे मिली ते एक किलो पर्यंत तेल ते मिळवतात व प्लास्टिक बाटलीमध्ये पॅकिंग करून त्याची 100 मिली करिता पाचशे रुपये या दराने विक्री करतात.
हे तेल भाजलेल्या जखमा चांगल्या करण्यासाठी तसेच मसाज, त्वचेचे विकार, संधिवात, स्नायू दुःखी तसेच अर्धांग वायू इत्यादी आजारामध्ये उपयोगी पडते. परंतु या तेलाचा वापर वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानेच करण्याचे देखील वारे सांगतात. त्यांच्या या व्यवसायामध्ये संपूर्ण कुटुंबाची त्यांना मदत होते व दररोज चार ते पाच किलो तर महिन्याला दीडशे किलो पर्यंत खेकड्यांची विक्री ते करतात. प्रति किलोला साडेतीनशे रुपये दर मिळतो व दर महिन्याला एक किलोपर्यंत तेलाची विक्री देखील होते. हॉटेलच नाही तर प्रदर्शने तसेच महोत्सवातून खेकड्यावर आधारित पदार्थांचा स्टॉल देखील ते लावतात व प्रत्येक महिन्याला जो खर्च होतो त्यातील 50 टक्के पर्यंत नफा शिल्लक राहतो.