स्पेशल

चंद्रपूर जिल्ह्यातील पिता-पुत्रांची शेती आहे लाखात एक! आयडियाने कमवतात लाखो रुपये, वाचा यशोगाथा

Published by
Ajay Patil

तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या शेतीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पिकांची लागवड करतात व शेतीची तुमची पद्धत कशी आहे? या सगळ्या गोष्टींवर तुमचे उत्पादन आणि मिळणारे आर्थिक उत्पन्न अवलंबून असते. अगदी पाच ते दहा एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याने जर आधुनिक पद्धतीने शेती तंत्र अवलंबले नाही तर त्याला दोन ते तीन एकर क्षेत्र असलेल्या शेतकरी उत्पादन घेण्याच्या बाबतीत भारी ठरतो.

तुमच्याकडे उपलब्ध क्षेत्रापेक्षा जे क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्ही शेती कशा पद्धतीने करतात याला खूप महत्त्व आहे. आजकालचे शेतकरी अनेक वेगवेगळ्या कल्पना शेतीमध्ये उतरवतात आणि शेतीसोबत त्यालाच निगडित असलेले काही व्यवसाय करून आपल्या आर्थिक उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर भर टाकतात.

अशी अनेक उदाहरणं आपल्याला सध्या दिसून येतात. त्यापैकी जर आपण चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील सुनील सुकारे आणि त्यांचा मुलगा धीरज या पिता पुत्रांच्या जोडीचा विचार केला तर हा मुद्दा तुम्हाला व्यवस्थित पटेल.

वास्तविक पाहता चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुका हा धान पिकासाठी प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. परंतु या पिता-पुत्रांनी मात्र  वेगळ्याच पद्धतीने शेतीची पद्धत अवलंबित व वर्षाला लाखो रुपयांचे उत्पादन या माध्यमातून ते मिळवत आहेत.

 सुकारे पितापुत्राची यशोगाथा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुका हा प्रामुख्याने धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. परंतु या धान पिकाला फाटा देत सुनील सुकारे व त्यांचा मुलगा धीरज  यांनी मात्र त्यांच्या पाच एकर जमिनीमध्ये बारमाही प्रकारच्या विविध भाजीपाला पिकांची लागवड करून वर्षाला लाखो रुपये कमावण्याची किमया साध्य केलेली आहे.

इतकेच नाही तर धीरज हा मत्स्य व्यवसायामध्ये प्रशिक्षित असल्यामुळे त्याने त्या शेतामध्येच मत्स्यटाक्या उभारून त्या माध्यमातून माशांचे उत्पादन देखील घ्यायला सुरुवात केली व त्या माध्यमातून देखील ते चांगले पैसे मिळवत आहेत. नागभीड तालुक्यातील गिरगाव हे त्यांचे गाव असून त्या ठिकाणीच ते राहतात.

तंत्रज्ञानाचा वापर करून आणि योग्य नियोजनाने शेतीतून पैसा कसा मिळवावा हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. सध्याची नैसर्गिक परिस्थिती पाहता शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. संतोष सुकारे यांनी प्रचंड कष्ट घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत वेगवेगळे प्रयोग करून आज शेती फायद्याची बनवलेली आहे.

 सेंद्रिय भाजीपाला उत्पादनावर देतात भर

त्यांच्या या पाच एकरमध्ये ते धान पीक घेतातच परंतु त्यासोबतच कारली, चवळी तसेच मेथी, पालक, दोडके, कोथिंबीर आणि भेंडी सारख्या भाजीपाला पिकांची लागवड करायला त्यांनी सुरुवात केली व त्यासाठी पूर्णपणे ते रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतेच वापरतात.

यावर्षी त्यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये चवळीची लागवड केलेली होती व या चवळीच्या माध्यमातून त्यांना दीड एकर शेतामध्येच तीन लाखांचे उत्पन्न मिळाले.

या चळवळीच्या नियोजनाकरिता त्यांना एक लाख रुपये इतका खर्च आलेला होता व खर्च वजा जाता दोन लाख रुपये त्यांना मिळाले. एका विहिरीच्या माध्यमातून ते पूर्ण शेतीला पाण्याचे व्यवस्थापन करतात व सौर पॅनल बसवून नियमितपणे पिकांना पाण्याची व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे.

 भाजीपालाच्या सोबतीला आहे शेळी कुक्कुटपालन

भाजीपाला पिकच नाही तर धीरज हा शेळीपालन तसेच कुक्कुटपालन व मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून घरच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर टाकत आहे. मत्स्य पालनाकरिता त्याने शेतामध्येच टाक्या बनवलेल्या आहेत व या माध्यमातून मत्स्य पालन करतो व 50 ते 60 हजारांचे उत्पादन आरामात वर्षाला घेतो.

तसेच टीन पत्रांचा वापर करून शेतामध्ये फार्म हाऊस सुरू केले असून त्यामध्ये शेळीपालन, गावरान कोंबड्यांचेपालन देखील तो करतो व गावरान कोंबड्या व शेळ्यांच्या विक्रीतून देखील चांगले उत्पादन तो घेतो.

विशेष म्हणजे अजून पर्यंत शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ न घेता  स्वतःच्या हिमतीवर त्यांनी पाच एकर शेती व्यवस्थितरित्या फुलवली व बहरवली आहे व त्या माध्यमातून चांगला पैसा देखील ते मिळवत आहेत.

Ajay Patil