Ganeshotsav 2024:- महाराष्ट्रातील आपण असे अनेक मंदिरे बघतो की ते निसर्गरम्य अशा डोंगरदऱ्याच्या ठिकाणी असतात व त्या ठिकाणी निसर्गाची हिरवाई आणि देवदर्शन यांचा एकत्रित लाभ आपल्याला घेता येतो. सध्या पावसाचा कालावधी आणि गणेशउत्सव सुरू असून अनेक गणेश भक्त हे या कालावधीमध्ये गणेश मंदिरांना भेटी देऊन दर्शनाचा लाभ घेतात.
श्री गणेश हे आराध्य दैवत असल्यामुळे एकंदरीत भारतीय परंपरेत गणेशाच्या पूजेला खूप मोठे महत्त्व आहे. त्याकरिता आपल्यापैकी बरेच जण गणेश दर्शनासाठी एखाद्या ठिकाणी जाण्याचा प्लान करतात.
अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील जर या गणेश उत्सवात श्री गणेशाचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही नासिक आणि पालघर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या आणि निसर्गरम्य अशा परिसरात वसलेल्या देवबांध गणेश मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेऊ शकतात व त्यासोबतच त्या ठिकाणी असलेल्या निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटनाचा देखील आनंद घेऊ शकता.
देवबांध येथे आहे दुर्गम व डोंगराळ भागात वसलेले गणरायाचे स्थान
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि जव्हार इत्यादी परिसर बघितला तर तो निसर्गाने समृद्ध असलेला परिसर आहे. याच परिसरामध्ये नाशिक आणि पालघर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या जव्हार पासून 45 किलोमीटर, नासिक पासून इगतपुरी मार्गे गेले तर 65 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले देवबांध येतील गणेश मंदिराचा परिसर खूप निसर्गाने नटलेला परिसर म्हणून ओळखला जातो व या ठिकाणी सध्या पर्यटक देवदर्शन आणि पर्यटनाचा एकत्रित आनंद घेताना आपल्याला दिसून येत आहेत.
देवबांध हे मोखाडा तालुक्यात असून अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात वसलेले गणरायाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणाचे श्री गणेश मंदिर 1986 मध्ये बांधण्यात आले. या ठिकाणी असलेल्या गणेशाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणची मूर्ती ही पंचधातूची असून बैठे स्वरूपामध्ये आहे व ध्यान गजमुख आहे.
या ठिकाणाच्या गणेश मूर्तीच्या अंगावर कोरीव अलंकार, लंब उदरभोवती सर्पमेखला आहे. देव बांधाच्या या गणेश मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नाशिक येथे असलेल्या श्री सुंदर नारायण मंदिराची प्रतिकृती आहे. या मंदिराच्या मंडपावर एक मुख्य घुमट व त्या सभोवती तीन छोटे घुमट असून या स्थानाला देवबांध गणपती असे म्हणतात.
देवबांध हे नाव कसे पडले?
जेव्हा आपण देवबांध गणेशाच्या दर्शनाला जातो तेव्हा त्या मार्गावर अनेक नागमोडी अशी वळणे घेत देवबांध नावाची नदी वाहते. विशेष म्हणजे या नदीच्या ठराविक भागालाच देवबांध हे नाव पडले आहे व मुख्य वैतरणेची ही उपनदी आहे. मोखाडा गावामध्ये या नदीचा उगम होतो व या नदीवर खोडाळा गावाजवळ पुल आहे.
या नदीच्या पात्रामध्ये एक प्रचंड दगडाची शिळा असून तिने नदीचे अर्धे पात्र अडवून ठेवलेले आहे. या शिळेकडे पाहिले तर असे वाटते की कोणीतरी हेतूपूर्वक ती आडवी ठेवली आहे व यालाच देवांनीच बांध घातला असे म्हटले जाते व म्हणून त्याला देवबांध असे आदिवासी म्हणतात.
जेव्हा तुम्ही जव्हार ते शहापूर मार्गावर बसने जातात तेव्हा त्या ठिकाणी मार्गावर असणाऱ्या घनदाट झाडे व त्या झाडांमधून लहान लहान वळणे घेत जाणारा रस्ता व या रस्त्यावरून प्रवासाचा सुखद आनंद घेत आपण या मंदिरापर्यंत जाऊ शकतो. तसेच या ठिकाणी अशोक धबधबा असून त्या ठिकाणी तुम्ही पर्यटनाचा आणि दर्शनाचा दुहेरी आनंद घेऊ शकतात.