Scheme For Women:- समाजातील विविध घटकांसाठी केंद्र सरकार व प्रत्येक राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक लाभाच्या अशा योजना राबवल्या जात आहेत.या योजनांच्या माध्यमातून समाजातील अशा घटकांचे आर्थिक, सामाजिक दृष्टिकोनातून प्रगती व्हावी हा सरकारचा उद्देश आहे.
त्यासोबतच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे पावले उचलली असल्याने महिलांसाठी देखील अनेक प्रकारच्या योजना अमलात आणल्या गेलेल्या आहेत. अशा योजनांच्या माध्यमातून महिला आर्थिक दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण व्हावेत व त्यांनी कुणावर अवलंबून न राहता त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून जर आपण पाहिले तर केंद्र सरकारने नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली असून या योजनेच्या निर्देशांना केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार तब्बल 1261 कोटी रुपये खर्च करणार असून 2025-26 पर्यंत जवळपास 14,500 महिला स्वयंसहायता समूहांना कृषी सहायता करिता ड्रोन भाडेतत्त्वावर पुरवले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने या योजनेची दिशानिर्देश जारी केले असून लवकरच ही योजना आता कार्यरत होणार आहे.
महिलांना या योजनेतून काय मिळतात फायदे?
नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन खरेदीवर 80% पर्यंत सबसिडी मिळते. म्हणजेच कमाल आठ लाख रुपये पर्यंत अनुदानाचा लाभ दिला जातो. इतकेच नाही तर या गटांना ड्रोन सोबत बॅटरी सेट तसेच स्प्रे असेंबली आणि ड्रोन चालवण्याची ट्रेनिंग इत्यादी सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
इतकेच नाही तर एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडाच्या माध्यमातून तीन टक्के व्याज मुक्त कर्ज देण्याची सुविधा देखील यामध्ये उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत ज्या महिलांची निवड होते त्यांना पंधरा दिवस ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण मिळते व ड्रोन दीदी म्हणून ज्या महिला काम करतील त्या महिलेला पंधरा हजार रुपयापर्यंत महिन्याला पगार देखील दिला जाणार आहे.
कुणाला करता येईल अर्ज?
केंद्र सरकारच्या नमो ड्रोन दीदी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी महिला या स्वयंसहायता समूहाशी म्हणजेच बचत गटाशी संबंधित असणे गरजेचे आहे व वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा आर्थिक कमजोर गटात असतील तर या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ज्या महिला शेती व्यवसायाशी संबंधित असतील अशा महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महिलांकडे आधार कार्ड तसेच रहिवासी पुरावा, पॅन कार्ड, स्वतःचा ईमेल आयडी तसेच फोन नंबर, पासपोर्ट साईज फोटो आणि सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे स्वयंसहायता बचत गटाचे ओळखपत्र असणे गरजेचे आहे.
या योजनेअंतर्गत मिळते ड्रोन पॅकेज
या योजनेअंतर्गत ड्रोन पॅकेज दिले जाते व यामध्ये स्प्रे असेंबली सोबत बेसिक ड्रोन, कॅरीबॉक्स, बॅटरी सेट, डाऊन वर्ड कॅमेरा, ड्युअल चॅनल फास्ट बॅटरी चार्जर,एनीमोमीटर, चार्जर हब आणि त्यासोबत एक वर्षाची वारंटी देखील मिळणार आहे.
इतकेच नाहीतर या पॅकेज मध्ये चार अतिरिक्त बॅटरी सेट, प्रोपेलर सेट, नोजल सेट व पंधरा दिवसांची ट्रेनिंग, एक वर्षाचा विमा व दोन वर्षाची देखभाल आणि जीएसटीचा यामध्ये समावेश आहे.