स्पेशल

‘या’ महिलेने कष्टाने सुरू केला मासेपालन व्यवसाय व आज वर्षाला आहे 45 लाख कमाई! वाचा कसे केले शक्य?

Published by
Ajay Patil

महिला म्हटले म्हणजे फक्त चूल आणि मूल हि जी काही संकल्पना होती ती आता मागे पडली असून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी अनन्यसाधारण प्रगती केली आहे व प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला कर्तुत्व पार पाडत आहेत. असे एकही क्षेत्र नाही की त्यामध्ये महिला नाहीत.

भारताच्या अगदी संशोधन क्षेत्रापासून तर आयटी तसेच प्रशासकीय सेवेत देखील आज महिला पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना पुरुषांच्या पुढे असल्याचे आपल्याला दिसून येते. याला शेतीक्षेत्र देखील अपवाद नाही. शेती क्षेत्रामध्ये देखील महिलांनी  स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा उमटवल्याचे आपण अनेक उदाहरणांच्या माध्यमातून पाहतो.

अगदी शेती क्षेत्रातील कर्तुत्वाच्या जोरावर आपली एक नवीन ओळख निर्माण केल्याचे उदाहरण घेतले तर आपल्याला उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथील सुबुही नाज यांचे घेता येईल. अगदी विपरीत परिस्थितीमध्ये यांनी जीवनात येणाऱ्या समस्यांशी दोन हात करत मासेपालन व्यवसाय सुरू केला व आज या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला तब्बल 45 लाखांची कमाई ते करत आहे.

 सुबुही नाज यांनी मासे पालन व्यवसायातून साधली आर्थिक प्रगती

उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथील रहिवासी असलेल्या सुबुही नाज यांनी जीवनामध्ये अनेक चढउतार अनुभवले. विशेष म्हणजे जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा लग्नाच्या तीनच वर्षानंतर म्हणजेच 1997 यावर्षी त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे साहजिकच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सगळी जबाबदारी नाज यांच्यावर आली.

मुलांचे पालन पोषण तसेच इतर सर्व जबाबदारी त्यांना पार पाडावी लागली.परंतु पतीच्या निधनाच्या दुःखात बुडून न जाता त्यातून बाहेर पडत आलेल्या संकटाशी दोन हात करण्याकरिता त्यांनी सुरुवात केली व उदरनिर्वाह करिता १९९८ मध्ये वाराणसीला कपड्यांचे दुकान सुरू केले.

या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मुलाला उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सुबूही यांचा मुलगा अब्दुल यांनी देखील आईच्या कष्टाचे चीज केले व बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मधून कला शाखेत पदवी पूर्ण केली.

त्यानंतर मत्स्य विज्ञान विषयातून पदवी संपादन केली व कोलकाता येथील आयसीआर सेंटर इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मध्ये काम करायला सुरुवात केली.

मत्स्य व्यवसायाशी संबंधित असलेल्या संस्थेत अब्दुल काम करत असल्यामुळे त्यांना मत्स्य पालन व्यवसाय विषयी चांगल्या प्रकारे माहिती होती व याबाबत त्यांनी सुबूही यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर  सुबूही नाज यांनी वयाच्या 48 व्या वर्षी मासे पालन व्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.

 अशी केली मासेपालन व्यवसायला सुरुवात

मत्स्यपालन व्यवसाय करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती व त्याकरिता त्यांनी सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा फायदा घेतला. या योजनेच्या  माध्यमातून त्यांना तीस लाख रुपयांचे अनुदान मिळाले व या मदतीच्या जोरावर त्यांनी स्वतःचा मत्स्य प्लांट उभारला. 2022 ते 2024 या कालावधीत त्यांनी तब्बल 83.6 टन माशांचे उत्पादन घेण्यात यश मिळवले.

मासे पालन व्यवसायातील त्यांच्या या अनन्य साधारण यशामुळे केंद्र सरकारकडून त्यांना राष्ट्रीय मत्स्य शेतकरी पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आले आहे. परंतु हा व्यवसाय जेव्हा त्यांनी सुरू केला तेव्हा लगेचच त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळाले नाही.

हे यश  मिळवण्यासाठी त्यांना अनेक अवघड समस्यांना तोंड द्यायला लागले व त्यातून वाट काढत ते या यशापर्यंत पोहोचले. मासे पालन व्यवसायासाठी त्यांनी तलावांची उभारणी केली व आर्थिक वर्ष 2023 मध्ये 30 टन माशांचे उत्पादन घेतले

व 2024 मध्ये तब्बल यामध्ये वाढ करत 36 टन माशांचे उत्पादन मिळवले. मासे पालनामध्ये  ते प्रामुख्याने ग्रास कार्प तसेच कटला व रोहू इत्यादी माशांच्या जातींचे पालन करतात व सध्या मासे पालनातून वर्षाला 45 लाख रुपये पर्यंतची कमाई करत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil