या वर्षीच्या एप्रिल, मे व जून या मुख्य लग्नाच्या सिझनमध्ये, लग्नसराईच्या भरवशावर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना लग्नाचे कमी मुहूर्त मिळणार आहेत. याचा फटका त्यांच्या आचारी, मंगल कार्यालये, मंडप, डीजे अशा सर्व व्यवसायांना बसणार असल्याचे बोलले जात आहे.
एप्रिल, मे, जून महिना म्हणजे लग्नसराईचा सिझन. या महिन्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या मुला- मुलींचे लग्न उरकून टाकतात; कारण पुन्हा शेतकऱ्यांना पेरणी आणि शेतीच्या कामाकडे लक्ष द्यावे लागते, वेळ द्यावा लागतो; पण यावर्षी लग्नाचे मुहूर्त अत्यंत कमी असल्यामुळे या क्षेत्राशी संबंधित व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची भीती सतावत आहे.
फारसे बुकिंग नसल्याने त्यांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागणार आहे. केटरिंग वाले, आचारी, मंडप व्यवसायिक, मंगल कार्यालयाचे चालक ते छायाचित्रकार, गुरुजी, डीजेवाले, फुल वाले, डेकोरेशनवाले, मालवाहतूक करणारी वाहने, लग्नासाठी सर्वच प्रकारचे साहित्य पुरविणारे, लाईट, मेकअप आर्टिस्ट, बँड पथक अशा या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ६० ते ७० व्यवसायिकांना फटका बसणार आहे.
याचा शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील व्यवसायिकांनाही आर्थिक फटका बसणार आहे. एप्रिल महिना सोडला, तर मे आणि जूनमध्ये फारसे लग्नाचे मुहूर्त नाहीत, त्यामुळे अनेकांच्या व्यवसायाचे गणीत बिघडणार आहे. नोव्हेंबर ते जून असा लग्नकार्याचा सिझन असतो.
यावर्षी गुरु आणि शुक्र त्यांचा एकत्रित अस्तकाल असतानाच म्हणजे १ मे ते ११ जूनपर्यंत फारसे लग्नाचे मूहूर्त नाहीत. पारंपारीक व्यवसाय अडचणीत तर येणारच आहेत; परंतु फोटोग्राफी व्यवसायामध्ये अलीकडे नवयुवकांची गुंतवणूक वाढली आहे.
गुंतवणुकीच्या मानाने त्यांना कामेही मिळत आहेत. प्री वेडींगचेही फॅड सध्या आले आहे. त्यात लाखो रुपयांचा खर्च वधू-वर करीत आहेत; परंतु लग्नाच्या तारखाच कमी असल्याने ऑर्डरीही या काळात कमी मिळणार आहेत. ज्यांनी कर्ज काढून फोटो तसेच व्हीडीओग्राफीचे साहित्य विकत घेतलेले आहे, ड्रोन कॅमेरे हे सध्या प्रत्येक लग्नात आकर्षणच झाले आहे. त्यामुळे त्यांना कर्जाचे हफ्ते फेडणे अवघड जाणार आहे.
करोडो रुपयांचा बसणार फटका
एका लग्नासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. असा विचार करता बाजारपेठेत करोडो रुपयांची उलाढाल होत असते; परंतु मुहूर्त कमी असल्याने बाजारपेठेतील लग्नासाठीची उलाढाल कमी होणार आहे. त्यामुळे बाजाराला करोडो रुपयांचा फटका बसणार आहे.
तीन महिन्यात फक्त १३ तारखा
एप्रिल महिन्यामध्ये नऊ तारखा असून मे व जूनमध्ये प्रत्येक की केवळ दोन लग्नाचे महूर्त आहेत, अशी माहिती बेलापूर येथील किशोर गोरे गुरू यांनी दिली. मागील वर्षी एप्रिलमध्ये कोणताच मुहूर्त नव्हता, तर मे महिन्यामध्ये १३ आणि जून महिन्यामध्ये ११ लग्नाचे मुहूर्त होते.