Success Story:- शेतीमध्ये जो काही रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केला जातो याचे अनेक वाईट असे दुरगामी परिणाम हे जमिनीचा पोत आणि एकंदरीत मानवाचे आरोग्य यांच्यावर होतो. त्यामुळे आता सेंद्रिय शेती काळाची गरज असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत.
कोरोना कालावधीपासून आरोग्याच्या बाबतीत व्यक्ती हे सजग झाल्यामुळे सेंद्रिय उत्पादनांची मागणी हळूहळू वाढू लागल्याने सेंद्रिय शेतीला येणाऱ्या कालावधीत चांगले दिवस येतील अशी शक्यता आहे.
परंतु अजून देखील शेतकरी हव्या त्या प्रमाणामध्ये सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसून येत नाहीत व अशा शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे खूप गरजेचे आहे. यामुळेच गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील भावेश पुरोहित नावाच्या तरुणाने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळावे याकरिता धेनू प्रसाद नावाची कंपनी सुरू केली व आज ही कंपनी वर्षाला 70 लाख रुपये इतकी कमाई करत आहे.
भावेश पुरोहित याने उभारली धेनु प्रसाद नावाची कंपनी व सुरू केला व्यवसाय
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भावेश पुरोहित हा युवक गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील भाभर या गावचा रहिवासी आहे. तो उच्चशिक्षित असून त्याने बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी संपादन केली असून काहीतरी व्यवसाय करावा हे त्याच्या मनात होते व यामध्ये त्याला वडिलांकडून प्रेरणा मिळाली.
भावेशने त्याच्या वडिलांनी गाईंसाठी घेतलेले कष्ट जवळून पाहिलेले होते. त्यामुळे या गाई शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्हाव्यात अशी भावेश अशी इच्छा होती व या माध्यमातूनच त्याला व्यवसायाची कल्पना सुचली व येथूनच धेनू प्रसाद ॲग्रोव्हेट लिमिटेड कंपनीची पायाभरणी केली गेली.
या कंपनीच्या माध्यमातून सुरू केला गोमूत्र खताचा व्यवसाय
या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी तब्बल तीन वर्ष संशोधनावर घालवली व अखेर भावेशने गोमूत्र खताचा व्यवसाय सुरू केला. भावेशचे वडील जे गाई पाळत होते त्या माध्यमातून त्याला 50 लिटर गोमूत्र मिळत होते व त्या व्यतिरिक्त भावेश दररोज आजूबाजूच्या गावांमध्ये आणि शेतात जात असे व शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल माहिती देत असे.
परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती बद्दल सतत नकार त्याला मिळाला. सेंद्रिय शेती करण्यासाठी कोणतेही शेतकरी पाऊल उचलायला तयार नव्हते. त्यामुळे भावेशने गोमूत्र खताचे फायदे काय आहेत याविषयी शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करायला सुरुवात केली या कार्यशाळांच्या माध्यमातून त्याला यश मिळायला लागले.
या सगळ्या मेहनतीतून धेनुप्रसाद हे गोमूत्र डेअरी म्हणून उदयास आले असून आज पाचशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यामध्ये याची मदत होत आहे. भावेश याची धेनु प्रसाद कंपनीच्या माध्यमातून महिन्याला 45 हजार लिटर गोमूत्रावर प्रक्रिया केली जाते.
या कंपनीच्या माध्यमातून नैसर्गिक कीटकनाशक म्हणून धनरक्षक आणि माती कंडिशनर म्हणून धनभूमी सारखे उत्पादने उत्पादित केली जातात.2017 मध्ये स्थापन झालेल्या या या कंपनीची आज वर्षाकाठी सत्तर लाख रुपयांची कमाई आहे.