साधारणपणे युवकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर चांगले शिक्षण घेणे व शिक्षण संपल्यानंतर नोकरीच्या शोधात फिरणे व नोकरी मिळाली की जीवनाच्या चाकोरीत संपूर्ण जीवन जगत राहणे असा काहीसा प्रकार आपल्याला दिसून येतो. परंतु गेल्या काही वर्षापासून जर आपण पाहिले तर नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे शिक्षण घेऊन देखील युवक बेरोजगार असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे आता युवकांना व्यवसाय करण्याशिवाय पर्याय नाही व आता बरेच युवक त्यामुळे शेती व शेतीशी निगडित असलेल्या क्षेत्रामध्ये नशीब आजमावतांना आपल्याला दिसून येत आहेत. पण असे शिकले सवरलेले युवक जेव्हा शेतीमध्ये येत आहेत तेव्हा ते पारंपारिक पिके किंवा पारंपारिक शेतीची पद्धत झुगारून त्याऐवजी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करू लागले आहेत
व विविध प्रकारच्या फळबागा आणि भाजीपाला पिकांची लागवड करून नोकरीपेक्षा जास्तीचे उत्पन्न मिळवत आहेत. त्यामुळे हे चित्र नक्कीच दिलासादायक असे असे आहे. याच मुद्द्याला धरून जर आपण जाफराबाद तालुक्यातील भातोडी या गावचे तीन मित्रांची यशोगाथा पाहिली तर त्यानी देखील शिक्षण घेतले.
परंतु नोकरीच्या मागे न लागता शेती करायचे ठरवले व आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे शेतीत पाऊल ठेवल्यानंतर या मित्रांनी माळरानावर ड्रॅगन फ्रुटची शेती बहरवली आणि ती यशस्वी देखील केली.
तीन मित्रांनी फुलवली ड्रॅगन फ्रुटची बाग
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात वेळ न वाया घालवता शेतीत पाऊल ठेवून नवनवीन प्रयोग करण्याचे निश्चित करून जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात असलेल्या भातोडी या गावातील तीन तरुण मित्र एकत्र आले व त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी या दृष्टिकोनातून त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याचे निश्चित केले व ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली.
अशा पद्धतीने आज त्यांच्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रुट बहरले असून महिन्याच्या अखेरीस फळांचे काढणी सुरू होईल. या तिघा मित्रांनी जी काही यशस्वीपणे ड्रॅगन फ्रुटची शेती बहरवली त्यामुळे ते परिसरामध्ये एक चर्चेचा विषय ठरले आहेत. या गावचे सोपान भोरे तसेच नारायण किसन जगदाळे व गणेश सुभाष मोरे या तीन मित्रांची ही यशोगाथा आहे.
जेव्हा त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी त्याबद्दलची माहिती युट्युब वरून घेतली व लागवडीसाठी लागणारे बेणे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून विकत आणले. तसेच प्रत्येकी दोन एकर क्षेत्रावर त्यांनी जम्बो रेड या ड्रॅगन फ्रुट च्या जातीची लागवड केली. आवश्यक सगळे व्यवस्थापन चोख पार पाडले व या सगळ्या कामांमध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबाची देखील मदत झाली.
साधारणपणे लागवडीनंतर एक वर्षानंतर आज या ड्रॅगन फ्रुटला फळे लागली असून त्यांची काढणी आता सुरू होणार आहे. यामध्ये त्यांना विश्वास आहे की, त्यांनी तिघ मिळून प्रत्येकाच्या दोन एकर शेतामध्ये ड्रॅगन फ्रुट एकत्रित पद्धतीने लावलेले आहे व प्रत्येकाला यातून एकरी पाच टन उत्पादन मिळेल असा त्यांचा अंदाज आहे.
जर त्यांना एकरी पाच टन उत्पादन मिळाले तर त्यांना एकरी सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. सध्या या तिन्ही मित्रांच्या यशाची कहाणी शेतकऱ्यांमध्ये पसरली असून त्यांच्या शेतीला बरेच शेतकरी भेट देताना देखील दिसून येत आहेत. महत्वाचे म्हणजे जालना सारख्या परिसरामध्ये देखील ड्रॅगन फ्रुटची शेती यशस्वी करता येणे शक्य आहे हे या तीन तरुणांच्या प्रयोगाने सिद्ध झालेले आहे.
ड्रॅगन फ्रुटचीच का केली निवड?
ड्रॅगन फ्रुटबद्दल माहिती देताना सोपान भोरे यांनी म्हटले की, आम्ही ड्रॅगन फ्रुटबाबत संपूर्ण माहिती youtube च्या माध्यमातून मिळवली. आम्हाला कळले की हे फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायद्याचे आहेच. परंतु प्रत्येक ऋतूमध्ये देखील याला चांगली मागणी असते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील ड्रॅगन फ्रुट फायद्याचे आहे.
त्यामुळे ड्रॅगन फळाची मागणी लक्षात घेऊन आम्ही या शेतीचा प्रयोग करण्याचे ठरवले. तसेच लागवडीनंतर या झाडाच्या आयुष्य जवळपास वीस वर्षे आहे व प्रत्येक वर्षी उत्पन्न मध्ये वाढ होत असते अशी देखील माहिती त्यांनी दिली व त्यांना या सगळ्या कामांमध्ये तालुका कृषी विभागाचे भरपूर सहकार्य लाभले.