Marathi News : सहनशीलता व आदर हा चांगल्या विवाहाचा पाया आहे आणि क्षुल्लक मतभेदांचे मोठ्या भांडणामध्ये रूपांतर होता कामा नये, असे मत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीवेळी व्यक्त केले.
यासोबतच न्यायालयाने हुंड्यासाठी छळाची तक्रार करणाऱ्या एका महिलेची पतीविरोधातील याचिका फेटाळून लावली.
पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने महिलेच्या पतीची आपल्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला.
न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने सुनावणी करताना काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. अनेकदा विवाहित महिलेचे पालक आणि जवळचे नातेवाईक ‘पराचा कावळा’ करतात.
त्यामुळे वाद मिटण्याऐवजी वैवाहिक नाते पूर्णपणे उद्ध्वस्त होते. सहनशीलता, एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचा आदर करणे हा विवाहाचा पाया आहे. एकमेकांच्या चुका एका मयदिपर्यंत सहन करणे हे प्रत्येक वैवाहिक नात्यात मुळातच असणे आवश्यक आहे.
लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे मानले जाते. अशावेळी किरकोळ वाद, क्षुल्लक मतभेदांचे मोठ्या भांडणांमध्ये रूपांतर होऊ देता कामा नये. पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर महिला, तिचे आई- वडील, नातेवाईक यांच्या मनात सर्वप्रथम पोलिसात तक्रार दाखल करण्याचा विचार येतो.
जसे काही पोलीस हे सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहेत. प्रकरण पोलिसांत पोहोचताच पती-पत्नीमध्ये समेट होण्याची शेवटची शक्यता देखील संपुष्टात येते, असे खंडपीठ म्हणाले. वैवाहिक वादांमध्ये सर्वाधिक फटका मुलांना बसतो, असेही खंडपीठाने नमूद केले. या प्रकरणात महिलेने पतीवर हुंड्यासाठी छळाचा आरोप केला होता.
■नवरा-बायको आपल्या मनात इतके विष घेऊन भांडतात की, ते एका क्षणासाठी देखील विचार करत नाहीत की, आपले नाते तुटले तर मुलांवर त्याचा काय परिणाम होईल. परिस्थिती शांत डोक्याने हाताळण्याऐवजी फौजदारी कारवाई सुरू केल्याने एकमेकांना द्वेषाशिवाय काही मिळणार नाही. -सर्वोच्च न्यायालय