Tractor News : अलीकडे भारतात शेतीचा व्यवसाय हा पूर्णपणे आधुनिक होत चालला आहे. आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे. ट्रॅक्टर सारख्या यंत्रांच्या वापरामुळे शेतीचा व्यवसाय सोपा झाला आहे.
अगदीच पूर्व मशागतीपासून ते शेती पिकांच्या काढणीपर्यंत सर्वच ठिकाणी ट्रॅक्टरचा उपयोग केला जात आहे. फवारणीसाठी सुद्धा अलीकडे ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. यामुळे शेतीचा व्यवसाय हा फारच सोपा झाला असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ देखील झाली आहे.
ज्या कामासाठी आधी तासंतास वाट पहावी लागत होती आता ते काम अवघ्या काही मिनिटात पूर्ण होत आहेत. मजूर टंचाई चा प्रॉब्लेम देखील ट्रॅक्टर मुळे मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पण, नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी खूप मोठी रक्कम लागते आणि बहुतेक शेतकरी एवढी मोठी रक्कम गोळा करू शकत नाहीत.
म्हणून अनेकांना इच्छा असूनही ट्रॅक्टर खरेदी करता येत नाही. पण, अशावेळी शेतकऱ्यांना बँका मदत करतात. ट्रॅक्टरसाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. दरम्यान जर तुम्हीही हप्त्यावर ट्रॅक्टर घेण्याच्या तयारीत असाल तर आजचा हा लेख तुमच्या कामाचा ठरणार आहे.
आज आपण ट्रॅक्टर साठी कर्ज घ्यायचे असेल तर यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ? यासाठीची पात्रता नेमकी काय असते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ट्रॅक्टर कर्जासाठी किती व्याजदर आकारले जाते?
ट्रॅक्टर साठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला नऊ टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना किमान 9% दराने ट्रॅक्टर साठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. देशातील इतर बँका देखील याच व्याजदराच्या आसपास ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देतात.
देशातील सर्वच खाजगी, सरकारी बँका आणि एन बी एफ सी कडून ट्रॅक्टर साठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. आता आपण ट्रॅक्टर कर्जासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची आणि पात्रतेची माहिती जाणून घेऊयात.
ट्रॅक्टर कर्जासाठी आवश्यक पात्रता
नवीन ट्रॅक्टर साठी कर्ज घ्यायचे असेल तर अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराच्या नावावर किमान 2 -3 एकर जमीन असावी. जमीन कर्ज घेणाऱ्या अर्जदाराच्या नावावरचं असणे आवश्यक आहे.
इतर सदस्यांच्या नावावर जमीन असेल तर अर्जदाराला कर्ज मिळणार नाही. शिवाय अर्जदाराचा CIBIL स्कोअर चांगला असावा. साडेसातशे ते आठशे दरम्यान सिबिल स्कोर असल्यास सहजतेने ट्रॅक्टर साठी कर्ज मिळू शकते.
कोण कोणती कागदपत्रे लागतात
मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर साठी कर्ज घ्यायचे असेल तर अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याचे पासबुक, सातबारा उतारा, २ पासपोर्ट आकाराचे फोटो, आधारशी जोडलेला मोबाईल नंबर, जमाबंदी पावती, CIBIL स्कोअर रेकॉर्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.