Tur Price Maharashtra 2025 : शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून तुरीचे दर दबावात आहेत. नोव्हेंबर महिन्यात तुरीला चांगला दर मिळत होता मात्र त्यानंतर सातत्याने बाजारभावात घसरण होत राहिली आणि सध्या तुरीचे दर काही ठिकाणी हमीभावापेक्षा कमी झालेत. यंदा तुरीला केंद्रातील मोदी सरकारने ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केलाय. पण सध्या स्थितीला बाजारांमध्ये तुरीला फक्त ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आले असून पिकासाठी आलेला खर्च कसा भरून काढावा हा प्रश्न आहे. खरेतर, सध्या तुरीची आवक खूपच कमी आहे, असे असतानाही बाजार एवढा पडलाय मग जेव्हा तूर मोठ्या प्रमाणात बाजारात येईळ तेव्हा काय होईल? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे आज आपण आगामी काळात तुरीचे दर कसे राहणार, तुरीचे बाजार भाव कधीपासून वाढू शकतात? तसेच बाजार भाव कितीने वाढणार याचा आढावा घेणार आहोत.
मंडळी, तूर हे राज्यातील एक महत्त्वाचे पीक असून याची लागवड विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाहायला मिळते. या पिकावर राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. पण सध्या याचे भाव मोठ्या प्रमाणात दबावात आहेत. देशातील काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक वाढत आहे.
पण अजूनही अपेक्षित आवक बाजारांमध्ये दिसत नाही, आवकेचा दबाव अद्यापही कमीच आहे. पण तरीही तुरीचा बाजार महत्वाच्या तूर उत्पादक राज्यांमध्ये हमीभावाच्या खाली गेला. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आले आहेत आणि अनेकांच्या माध्यमातून पॅनिक सेलिंग सुरू आहे.
परंतु बाजार अभ्यासकांनी आगामी काळात तुरीचे भाव वाढू शकतात असा अंदाज दिलाय आणि यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग करू नये असे आवाहन करत जर शेतकऱ्यांना तूर विक्री करणे गरजेचे असेल तर त्यांनी किमान हमीभावात आपल्या मालाची विक्री करावी असा सल्ला दिलाय. नोव्हेंबर 2024 मध्ये तुरीचा दर हा दहा हजाराच्या दरम्यान होता पण सध्या हा भाव 6500 ते 7200 च्या दरम्यान आहे.
म्हणजेच गेल्या काही दिवसांमध्ये तुरीचे दर अडीच ते तीन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. मंडळी, देशातील प्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तुरीची लागवड वाढली आणि आता नवी तूर मोठ्या प्रमाणात बाजारात येणार असे बोलले जात आहे अन याचं अंदाजामुळे बाजारात मोठी पडझड झालीये.
साहजिकचं आगामी काळात बाजारात तुरीची आवक वाढणार आहे आणि म्हणून आयातीचा दबाव बाजारावर तयार झालाय. पण आयात किती येणार हे देखील स्पष्ट आहे. त्यामुळे भावपातळी खूपच पडणार नाही. सध्या नव्या मालाची आवक हाच महत्वाचा घटक बाजारावर परिणाम करत आहे. इतर कोणतेही घटक भावावर दबाव तयार करत नाहीयेत.
दरम्यान, सध्या तुरीची आवक खूपच कमी असतानाही बाजार एवढा पडला मग जेव्हा तूर मोठ्या प्रमाणात बाजारात येईळ तेव्हा काय होईल ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दुसरीकडे सरकारने हमीभावात तूर खरेदी सुरू केली असून सध्याची खुल्या बाजारभावातील परिस्थिती पाहता हमीभावाने विक्री करावी की काय असाही प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय. अशातच बाजार अभ्यासकांनी देशात यंदा उत्पादन वाढीचा अंदाज असला तरी उत्पादन फार मोठ्या प्रमाणात वाढणार नाही.
येत्या काही महिन्यांनी तुरीच्या भावात तेजी येईल. यामुळे ज्या शेतकऱ्यांना थांबणे शक्य आहे त्यांनी काही काळ विक्री थांबवावी. मात्र, जेव्हा नवा माल बाजारात येईल तेव्हा भाव पातळी दबावातच राहील, हे ही खरे आहे. म्हणून जर तूर विक्री थांबवायची असेल तर पुढील काही आठवडे दर असेच दबावात राहू शकतात याचेही भान शेतकऱ्यांनी ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा आवकेचा दबाव कमी होईल तेव्हाच बाजारभावात सुधारणा होऊ शकते.
म्हणजे ज्या शेतकऱ्यांना विक्री थांबवायची आहे त्यांना जोपर्यंत आवकेचा दबाव कमी होत नाही तोपर्यंत थांबावे लागेल, अर्थातच शेतकऱ्यांना किमान तीन महिने तरी थांबावे लागणार आहे, तेव्हाच त्यांना काहीतरी फायदा होईल. जे शेतकरी मात्र थांबू शकत नाही, ज्यांना पैशांची गरज आहे त्यांनी किमान हमीभावात तुर विक्री करायला काही हरकत नाही. पण, काढणी झाल्यानंतर तीन महिने जे शेतकरी थांबू शकतात त्यांनी थांबायला हवे कारण की मार्च महिन्यानंतर तुरीच्या दरात तेजी येऊ शकते.
बाजारातील तूर आवक कमी झाल्यानंतर बाजारभाव हमीभावाचा टप्पा पार करणार असे बोलले जात आहे. येत्या काही महिन्यांनी तूर बाजार ८ हजारांचा टप्पा पार करू शकतो. मार्च नंतर दरात सुधारणा होत जाऊन नंतरच्या टप्प्यात मार्केट ९ हजार ते ९ हजार ३०० रुपयांचीही पातळी गाठू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी यावेळी व्यक्त केलाय.