स्पेशल

२०२४ मध्ये प्रत्येकी दोन सूर्य अन् चंद्र ग्रहण ! भारतात दिसणार कि नाही ? वाचा सविस्तर माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi News : गतवर्षात अनेक अविस्मरणीय घटना अनुभवल्यानंतर जगभरात नववर्षाच्या स्वागतार्थ मोठा जल्लोष करण्यात आला असून हे नवीन वर्ष आपल्यासोबत अनेक नवीन गोष्टी घेऊन येणार आहे.

खगोलीय घडामोडींसाठीही हे वर्ष अनोखे असणार आहे. या काळात चंद्र आणि सूर्य ग्रहण पाहायला मिळणार आहे. येत्या वर्षात दोन सूर्य आणि दोन चंद्रग्रहण होणार आहेत. २०२४ मध्ये संपूर्ण सूर्य ग्रहणदेखील पाहायला मिळणार असून शास्त्रज्ञांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. मात्र यातील एकही ग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

नवीन वर्ष २०२४ चे पहिले ग्रहण हे चंद्रग्रहण असून २४ व २५ मार्च रोजी चंद्रग्रहण होणार आहे. यावेळी चंद्र केवळ पृथ्वीच्या सावलीच्या बाहेरील कक्षेतून जाईल. त्यामुळे हे ग्रहण फार थोड्या काळासाठी असेल.

त्यामुळे पूर्ण किंवा आंशिक ग्रहणाच्या तुलनेत ते उघड्या डोळ्यांनी पाहणे कठीण असेल. खगोलीय अभ्यासानुसार, हे ग्रहण युरोप, ईशान्य आशिया, ऑस्ट्रेलियाचा मोठा भाग, आफ्रिकेचा काही भाग, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दिसेल.

त्याचप्रमाणे पॅसिफिक महासागर, अटलांटिक, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामध्येही ते दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी १०.२३ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे ग्रहण असणार आहे. त्यामुळे ते भारतात पाहता येणार नसल्याचे खगोल शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

तर २०२४ चे पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी सगळे खगोलशास्त्रज्ञ आतुरतेने वाट पाहत आहेत. नासाने दिलेल्या माहितीनुसार, हवामान स्वच्छ असेल तर सगळ्यात आधी उत्तर अमेरिकेच्या मेक्सिकोच्या पॅसिफिक किनारपट्टीवर हे सूर्यग्रहण पाहण्यास मिळेल. यासाठी ११.०७ ची वेळ देण्यात आली आहे.

तर भारतीय वेळेनुसार, रात्री ९.१२ पासून या ग्रहणाला सुरुवात होईल ते ९ एप्रिल रोजी मध्यरात्री २.२२ पर्यंत सुरू राहील. त्यामुळे भारतीयांना हे ग्रहण पाहता येणार नाही. वर्षातील तिसरे ग्रहण हे चंद्रग्रहण असणार आहे. ते १८-१९ सप्टेंबर रोजी होणार असून हे आंशिक ग्रहण आहे.

हे ग्रहणदेखील भारतातून पाहता येणार नाही. तर युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामध्ये हे ग्रहण पाहता येणार आहे.

Ahmednagarlive24 Office