Business Success Story:-व्यवसाय करायचा म्हणजे त्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते आणि तेव्हाच अशा व्यवसायामधून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पैसे मिळवता येतो अशा प्रकारचा समज आपल्याला बऱ्याच जणांचा दिसून येतो. परंतु समाजामध्ये असे अनेक व्यावसायिक आहेत ज्यांनी अनेक छोट्या स्वरूपामध्ये व्यवसायाला सुरुवात केली व त्याकरिता काही हजार रुपयांचे भांडवल गुंतवले.
परंतु कालांतराने मात्र अशा व्यवसायांचे रूपांतर कोट्यावधींच्या उलाढाल करणाऱ्या व्यवसायांमध्ये झाले. साहजिकच या मधला प्रवास हा सोपा नसतो. परंतु मेहनतीच्या जोरावर अनेक व्यक्ती व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेतात व व्यावसायिक जगतात प्रसिद्ध होतात.
या प्रकारे जर आपण संदीप जांगरा या व्यवसायिकाची यशोगाथा बघितली तर एकेकाळी कंपनीत काम करून महिन्याला नऊ हजार रुपये कमवत होते व नंतर त्यांनी पिझ्झा व्यवसायाला सुरुवात केली व आज ते पिझ्झा गॅलरीयाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी असून संपूर्ण देशात त्यांनी अनेक आऊटलेट्स उघडले आहेत.त्यांचे यशोगाथा आपण या लेखात घेऊ.
संदीप जांगरा यांची प्रेरणादायी कथा
संदीप जंगरा हे मूळचे हरियाणातील गोहाना येथील रहिवासी असून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका महाविद्यालयामध्ये बी टेकला प्रवेश घेतला. परंतु ते काही कारणास्तव बी टेक पूर्ण करू शकले नाही तर व बी टेकमध्ये ते फेल झाले. परंतु त्यांनी घरी खोटे सांगितले की ते उत्तीर्ण झाले आणि नोकरी शोधत आहेत.
संदीप यांचे एक मित्र ईशान यांच्या मदतीने त्यांना गुरुग्राम येथे नोकरी मिळाली व तेव्हा त्यांचा पगार नऊ हजार दोनशे रुपये इतका होता. या ठिकाणी काम करत असताना त्यांनी मित्रांसोबत 2014 मध्ये पहिल्यांदा पिझ्झा खाल्ला व त्यांना तो खूप आवडला व तेथूनच पिझ्झा विक्रीची कल्पना सुचली.
अशाप्रकारे झाली पिझ्झा व्यवसायाला सुरुवात
तसे पाहायला गेले तर संदीप त्यांच्या मनामध्ये व्यवसाय करायचे होते व त्यांना नोकरीमध्ये आवड देखील नव्हती. त्यातल्या त्यात त्यांना जी काही नोकरी होती त्यामध्ये पगार देखील खूपच कमी होता. म्हणून त्यांनी नोकरी सोडली व घरी परत आल्यानंतर सर्व सत्य परिस्थिती घरच्यांना सांगितली व वडिलांकडून शिवीगाळ देखील खावी लागली.
परंतु नंतर सर्व काही ठीकठाक झाल्यानंतर त्यांनी व्यवसायाचा विचार सुरू केला व पिझ्झा आउटलेट सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी पहिले पिझ्झा आउटलेट गोहाना या ठिकाणाहूनच सुरू केले.
अगोदर घेतले प्रशिक्षण
पिझ्झा आउटलेट सुरू करण्याच्या अगोदर त्यांना पिझ्झा विषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी अगोदर प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला व रोहतक मध्ये प्रशिक्षण घेतले त्याकरिता साधारणपणे दीड लाख रुपये खर्च आला.
हा खर्च संदीप यांच्या आईने केला व 2015 मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पहिले आउटलेट गोहाना येथे उघडले. तसेच यामध्ये संदीप जांगरा यांच्या भावाने देखील खूप मदत केली व साडेतीन लाख रुपये संदीपला दिले. 2017 मध्ये संदीप जांगरा यांनी ईशान या त्यांच्या मित्राला देखील व्यवसायात भागीदार म्हणून घेतले.
आज आहे कोट्यावधीची उलाढाल
आज त्यांच्या पिझ्झा गॅलरीयामध्ये 80 पेक्षा जास्त आउटलेट असून यामधून दररोज वीस हजार पेक्षा अधिक पिझ्झाची विक्री होते. त्यांच्या पिझ्झा गॅलरीयामध्ये पिझ्झा, पास्ता तसेच गार्लिक ब्रेड, सँडविच फ्राईज तसेच बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स इत्यादी विक्री केली जाते.
त्यांच्या पिझ्झाच्या किमती 69 रुपयांपासून ते 89 रुपयांपर्यंतच्या कॉम्बो किमतींपर्यंत आहेत. तसेच शेकडो लोकांना त्यांच्या व्यवसायातून रोजगार देखील मिळाला आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये त्यांच्या व्यवसायाची उलाढाल 15 कोटी रुपये होती. यावर्षी त्यांना 16 कोटी रुपयांची उलाढाल होईल अशी अपेक्षा आहे.