Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही नेहमीच चर्चेत असते. कधी या गाडीच्या महागड्या तिकीट दराची चर्चा होते तर कधी या गाडीमध्ये मिळणाऱ्या जेवणाची. सध्या देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत गाड्या धावत आहेत.
ही गाडी 2019 मध्ये सर्वप्रथम रुळावर पाहायला मिळाली. त्यावेळी ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली होती आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले.
आपल्या महाराष्ट्राला देखील अकरा वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. पुण्याला देखील आतापर्यंत तीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे.
पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस देखील पुणे मार्गे धावत आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास हा सुपरफास्ट झालाय यात शंकाच नाही. अशातच आता पुणेकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की वंदे भारत एक्सप्रेस चा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर आता रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर जानेवारी 2025 मध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली ते काश्मीरपर्यंत धावणार आहे.
या सगळ्यामध्ये दिल्ली आणि पुण्यात राहणाऱ्या लोकांनाही चांगली बातमी मिळू शकते. पुण्याचे खासदार मुरलीधर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन दिल्ली ते पुणे दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याची मागणी केली आहे.
ही मागणी मान्य झाल्यास प्रवाशांची अडचण कायमची दूर होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत खासदारांनी वंदे भारत मेट्रो सुरू करण्याची मागणीही केली.
त्यासाठी पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक आणि पुणे-कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत मेट्रो चालवण्याचा प्रस्ताव त्यांनी रेल्वेमंत्र्यांना दिला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झाला नसून, याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो, असे मानले जात आहे.
पुणे आणि जोधपूर दरम्यान नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा दाखला देत खासदारांनी रेल्वेमंत्र्यांना या दोन शहरांमधील गाड्यांची वारंवारता वाढवण्याची विनंती केली. यामुळे खासदार महोदयांच्या या मागण्या पूर्ण होणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.