Vande Bharat Sleeper Train Latest Update : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा रुळावर धावणार आहे. भारतीय रेल्वेने या अनुषंगाने तयारी देखील सुरू केली आहे. यामुळे येत्या काही दिवसांनी ही गाडी प्रत्यक्षात रुळावर भरधाव वेगाने धावताना दिसणार आहे. सध्या भारतात जी वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे ती फक्त चेअर कार प्रकारातील आहे.
सध्या देशात चेअर कार प्रकारातील जवळपास 65 वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 चेअर कार वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. पण लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा रुळावर धावणार आहे. या गाडीची चाचणी देखील सुरू करण्यात आली आहे.
या गाडीची चाचणी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यादरम्यान करण्यात आली. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेनची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. राजधानी मुंबईच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर आज अहमदाबाद ते मुंबई अशी वंदे भारत स्लीपरची ट्रायल रन घेण्यात आली.
वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी अंतिम टप्प्यात असून चाचणी दरम्यान तब्बल 130 Kmph वेगाने वंदे भारत स्लीपर आज अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावली आहे. या मार्गावर या गाडीची चाचणी यशस्वी झाली असून लवकरच ही गाडी सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू केली जाणार आहे.
ही गाडी देशात पहिल्यांदा कोणत्या मार्गावर धावणार याबाबत कोणतीच विकृत माहिती समोर आलेली नाही. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग अद्याप समोर आलेला नाही. पण मीडिया रिपोर्ट मध्ये पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट आपल्या महाराष्ट्राला मिळू शकते असा दावा केला जात आहे.
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली-मुंबई किंवा दिल्ली-कोलकाता दरम्यान चालवली जाऊ शकते असे म्हटले जात आहे. यासाठी ट्रेनची ट्रायल सुद्धा घेतली जात असून, त्यात ताशी 160 ते 180 किलोमीटर वेगाने ट्रेन चालवली जात आहे.
जानेवारीअखेर ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. नक्कीच मुंबईला पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळाली तर मुंबईकरांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरेल. या गाडीमुळे मुंबईकरांचा प्रवास हा मोठा अल्हाददायी आणि आरामदायी होणार आहे.