Vande Bharat Train : उद्या अर्थातच 31 ऑगस्ट 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट देणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ही पहिलीच संपूर्ण भारतीय बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली असून गेल्या पाच वर्षांच्या काळात देशातील 52 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
आपल्या महाराष्ट्राला देखील आठ नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीदरम्यान कोल्हापुरात आले होते आणि त्यावेळी त्यांनी कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे म्हटले होते.
ही गाडी मुंबई ते कोल्हापूर या दरम्यान चालवण्याची दाट शक्यता आहे. मात्र अद्याप रेल्वे बोर्डाने या गाडी संदर्भात कोणताच निर्णय घेतलेला नाही. यामुळे कोल्हापूर आणि मुंबईच्या नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
ही गाडी नेमकी कधी सुरू होणार हा मोठा यक्षप्रश्न आहे. अशातच आता उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट देणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. नवीन गाड्या डॉ एमजीआर चेन्नई सेंट्रल ते नागरकोइल आणि मदुराई ते बेंगळुरू छावणीपर्यंत चालवल्या जाणार आहेत.
रेल्वेच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकानुसार, पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दरम्यान आता आपण या दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कसं असणार नागरकोइल वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, डॉ MGR चेन्नई सेंट्रल ते नागरकोइल ही गाडी फक्त उद्घाटनाच्या दिवशीच चेन्नई सेंट्रल येथून सोडली जाणार आहे. पण जेव्हा या गाडीची सर्वसामान्यांसाठी नियमित सेवा सुरु होईल तेव्हा ती गाडी चेन्नई एग्मोर येथून धावणार आहे. ही ट्रेन बुधवार संपूर्ण आठवडा सेवेत राहणार आहे.
ट्रेन क्रमांक 20627 चेन्नई एग्मोर येथून पहाटे 5 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.50 वाजता नागरकोइलला पोहोचेल. शिवाय, ट्रेन क्रमांक 20628 नागरकोइल जंक्शन येथून दुपारी 2.20 वाजता सोडली जाईल आणि रात्री 11 वाजता चेन्नई एग्मोरला पोहोचणार आहे. ही गाडी तांबरम, विल्लुपुरम, तिरुचिरापल्ली, डिंडुगल, मदुराई, कोविलपट्टी आणि तिरुनवेल्ली या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
मदुराई-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक कसे राहणार?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मदुराई-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस मंगळवार वगळता सर्व दिवस चालवली जाईल. ट्रेन क्रमांक 20671 ही मदुराई येथून पहाटे 5.15 वाजता सोडली जाणार आहे आणि दुपारी 1 वाजता बेंगळुरू छावणीला पोहोचणार आहे.
तसेच, बंगळुरू छावणी येथून दुपारी दीड वाजता ही गाडी निघणार आहे आणि रात्री पावणेदहा वाजता मदुराईला पोहोचणार आहे. ही गाडी दिंडुगल, तिरुचिरापल्ली, करूर, नमक्कल, सालेम आणि कृष्णराजपुरम येथे थांबा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.