Vande Bharat Train : 2019 मध्ये भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. सध्या देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आतापर्यंत अकरा वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत.
भारतीय रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस चे जाळे विस्तारण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे पाहायला मिळते. असे असतानाच आता वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातून धावणारी एक महत्त्वाची वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत चालवली जाणार आहे.
म्हणजेच मराठवाड्यातील नांदेडला देखील वंदे भारत एक्सप्रेसचा लाभ मिळणार आहे. मुंबई ते जालना दरम्यान सुरू असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार नांदेड पर्यंत करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत.
यामुळे मुंबई ते नांदेड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. खरंतर, मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाली. या वंदे भारत एक्सप्रेसला छत्रपती संभाजीनगर मधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय.
यावरून, छत्रपती संभाजी नगरला स्वातंत्र्य वंदे भारत एक्सप्रेसची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे. दरम्यान, मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेड पर्यंत विस्तारली जाईल असे दिसते. मात्र या विस्ताराला प्रवासी संघटनांच्या माध्यमातून तीव्र विरोध होतोयं.
सिव्हिल एव्हिएशन कमिटी- टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ) या संघटनेने मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत विस्तारण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दाखवला आहे. मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड पर्यंत विस्तार झाल्यास या रेल्वेचे सध्याचे वेळापत्रक विस्कळीत होईल.
छत्रपती संभाजीनगरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होईल. नांदेडहून वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी असल्यास वेगळी रेल्वे सुरू करावी. म्हणून यासंदर्भात रेल्वेमंत्री आणि रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे.
यामुळे आता प्रवाशांचा हा विरोध पाहता मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात नेमका काय निर्णय होणार. ही गाडी नांदेड पर्यंत खरंच चालवली जाणार का ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.