तारीख होती २२ जून २००२४. या दिवशी प्रादेशिक साखर सहसंचालकांनी नगर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांना जोराचा झटका दिला. त्यापैकी श्रीगोंद्यातील माजी आमदार राहुल जगताप यांच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव तयार केला. तर उसाच्या पेमेंट थकबाकीपोटी पाथर्डीतील आ. मोनिका राजळे यांच्या वृद्धेश्वर कारखान्यावर कारवाईचा प्रस्तावही विचारात आहे.आता आपल्या मूळ बातमीकडे येऊ. बातमीचा विषय आहे, श्रीगोंद्यात महाविकास आघाडीकडून राहुल जगतापांऐवजी साजन पाचपुते यांना तिकीट मिळणार आणि पाथर्डीतून मोनिका राजळे यांच्याऐवजी चंद्रशेखर घुले यांना तिकीट मिळणार… आता या दोन्ही शक्यता आहेत. मात्र त्या शक्यता का वाढल्यात, तेच आम्ही सांगणार आहोत…
गेल्या आठवड्यात १४ जुलैला ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत श्रीगोंद्यात आले होते. ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनाला त्यांनी केले. त्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी साजन पाचपुते यांना आमदार करण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीतील जागावाटप झाले नसताना, संजय राऊत यांनी साजन यांना आमदार करण्याचे कसे काय सांगून टाकले..? महाविकास आघाडीची श्रीगोंद्याची जागा ठाकरे गटाला जाणार का..? शरद पवार गट श्रीगोंद्याची जागा सोडणार का..? निवडणुकीची तयारी करणारे शरद पवार गटाचे राहुल जगताप आता काय करणार..? असे अनेक प्रश्न जगतापांच्या कार्यकर्त्यांसह सगळ्यांनाच पडले. श्रीगोंद्याची जागा ठाकरे गटाला सोडली जाणार, असा अंदाज आम्ही महिन्यापूर्वीच मांडला होता. संजय राऊत यांच्या दौऱ्यानंतर त्यावर काही प्रमाणात शिक्कामोर्तब झाले.
आता तुम्ही म्हणाल, राहुल जगतापांना उमेदवारी का मिळणार नाही. तर महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, प्राथमिक जागावाटप हे अगोदरच ठरलेले असते. संभाव्य उमेदवार आणि पक्षाची ताकद यांचा अंदाज निवडणुकांपूर्वी सहा महिने काढलेला असतो. कुणाचे कितीही बळ असले आणि कुणी कितीही शब्द दिलेले असले तरी, जागावाटपात ऐनवेळी एक पाऊल मागेही घ्यावे लागते. गेल्या कित्येक वर्षांपासून श्रीगोंद्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होत आहे. मात्र यावेळी ही जागा ठाकरे गटाला सोडावी लागणार असल्याचे दिसते. त्यातच गेल्या महिन्यात प्रादेशिक साखर सहसंचालकांनी जगताप साखर कारखान्याच्या मालमत्तेच्या जप्तीचा प्रस्ताव तयार केला. त्यामुळे राहुल जगतापांना आता आमदारकीपेक्षा, कारखाना वाचविण्यावर आपली शक्ती खर्च करावी लागणार आहे. पक्षाकडे तिकीटासाठी भांडण्यापेक्षा, पक्षाची मदत घेऊन आपला कारखाना वाचवावा लागणार आहे. हे सगळे पाहता जगताप यावेळी बंडखोरीच्या भानगडीतही पडणार नाहीत. आणि या सगळ्या परिस्थितीचा आभ्यास करुनच राऊतांनी साजन पाचपुते यांची उमेदवारी जाहीर केली असावी, असा अंदाज बांधला जावू शकतो.
आता सेम अशीच परिस्थिती शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातही आहे. राजळे यांच्या वृद्धेश्वर साखर कारखान्याकडे सुमारे सव्वा आठ कोटींची थकबाकी आहे. या कारखान्यावर कारवाई करण्याचा प्रस्तावही गेल्या महिन्यात चर्चेत आला होता. शिवाय विद्यमान आ. मोनिका राजळे यांच्यावर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. तेथे भाजपमध्येच दोन गट पडले आहेत. दोन्ही गट उमेदवारीचा दावा करत आहेत. त्यामुळे एकाला उमेदवारी दिली, तर दुसरा गट विरोधात जाण्याची शक्यता वाढली आहे. पक्षातील भांडणे भाजपला बॅकफूटला घेऊन जाणार आहेत.
त्यापेक्षा ही जागा अजितदादा गटाला सोडून त्याऐवजी नगर शहर, पारनेर अशी एखादी जागा पदरात पाडून घेण्यात भाजप समाधान मानण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळेच तेथे राजळेंऐवजी तेथेही चंद्रशेखर घुलेंच्या नावाची चर्चा जोर धरु लागली आहे. शिवाय मराठा-ओबीसी वाद या मतदारसंघात झालाच तर विरोधातील प्रताप ढाकणे या ओबीसी उमेदवाराविरोधात चंद्रशेखर घुलेंचे मराठा कार्ड येथे चालू शकते, अशीही एक शक्यता व्यक्त केली जात आहे. ढाकणे हे पाथर्डी तालुक्यातील तर घुले हे शेवगाव तालुक्यातील असल्याने या दोघांतील मतविभागणी महायुतीच्या फायद्याची राहील, अशीही एक शक्यता आहे. गडाखांच्या नव्या सोयरीकीतून घुले व राजळे हे एकमेकांचे नातलग झाले आहेत. त्यामुळे घुलेंना उमेदवारी दिली तर, राजळे बंडखोरी करणार नाही हेही भाजपला माहिती आहे.
गेल्या आठवड्यात शरद पवारांनी अकोल्यात येऊन अमित भांगरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यापूर्वी संजय राऊतांनी श्रीगोंद्यात साजन पातपुते यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. हे दोन्ही नेते आपापल्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी घोषित केलेले उमेदवार हे फिक्स असतील, अशा शक्यता जास्त आहेत. याच शक्यता पाहता श्रीगोंद्यात राहुल जगतापांऐवजी किंवा काँग्रेसच्या घनश्याम शेलारांऐवजी साजन पाचपुते हेच उमेदवार असतील, असे गृहीत धरले जावू शकते. पाथर्डीतूनही चंद्रशेखर घुलेंच्या उमेदवारीवर विचार होऊ शकतो.