Voter ID Card Photo Change Process In Marathi : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा थरार रंगणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुती आपली कामगिरी सुधारण्यावर लक्ष देणार आहे. दुसरीकडे लोकसभेच्या रिंगणात चांगली दमदार कामगिरी केल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून आगामी निवडणुकीतही अशाच कामगिरीची त्यांना आशा आहे.
विशेष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. दरम्यान आज आपण मतदारांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. मतदानासाठी आवश्यक मतदार ओळखपत्रवरील फोटो कसा बदलायचा या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत.
खरेतर मतदार ओळखपत्र हे भारतीय नागरिकांसाठीचे एक अत्यावश्यक सरकारी दस्तऐवज आणि ओळखपत्र आहे. निवडणुकीच्या वेळी तुम्हाला मतदान करायचे असेल तर तुमचे मतदार ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड येण्यापूर्वी मतदार ओळखपत्र हेच सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र म्हणून वापरले जात होते. आता मतदान कार्डपेक्षा आधार कार्ड महत्त्वाचे बनले आहे. पण तरीही मतदान कार्ड पासपोर्ट अर्ज, ड्रायव्हिंग लायसन्स, वयाचा पुरावा इत्यादी अनेक कारणांसाठी आजही अनिवार्य आहे.
पण जर तुमच्या मतदार ओळखपत्रावर चुकीचा फोटो असेल, तो अस्पष्ट असेल किंवा तुम्हाला तुमचा फोटो आवडत नसेल आणि फोटो बदलायचा असेल तर हा मतदान कार्ड वरील फोटो घरबसल्या कसा बदलायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आज आम्ही तुम्हाला याची सविस्तर प्रोसेस सांगणार आहोत.
मतदान कार्ड वरील फोटो कसा चेंज करणार ?
मतदार ओळखपत्रातील फोटो बदलायचा असेल तर यासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल http://www.nvsp.in ला भेट द्या. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला येथे नोंदणी करावी लागणार आहे. रजिस्ट्रेशन अर्थातच नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचे आहे.
लॉगिन केल्यानंतर, होम स्क्रीन उघडेल. जिथे तुम्हाला Personal Details मध्ये Correction चा पर्याय दिसेल. यानंतर फॉर्म 8 चा पर्याय निवडा. आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार भाषा निवडू शकता. फॉर्मच्या वरच्या उजव्या बाजूला, तुम्हाला भाषा बदलण्याचा पर्याय मिळेल.
आता फॉर्ममध्ये आवश्यक माहिती प्रविष्ट करा. जसे की, राज्य, विधानसभेचे नाव आणि जिल्ह्याचे नाव इत्यादी माहिती तुम्हाला येथे भरायची आहे. यानंतर नाव, अनुक्रमांक, ओळखपत्र क्रमांक इ. भरा. मग, खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला काही सुधारणा पर्याय दिसतील.
आता तुम्हाला फोटो बदलायचा असेल तर फोटो ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर Browse वर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा नवीन फोटो निवडून अपलोड करावा लागणार आहे. फोटो अपलोड केल्यानंतर, तुम्हाला खाली मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि ठिकाणाचे नाव प्रविष्ट करावे लागणार आहे.
हा सर्व तपशील भरल्यानंतर, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर एक संदर्भ क्रमांक दिसेल. हा संदर्भ क्रमांक लक्षात ठेवा. यामुळे तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती चेक करता येणार आहे.