Marathi News : चांगल्या शुभमुहूर्तावर केले जाणारे विवाह सोहळे नवीन जोडप्यांसाठी चांगले मानले जातात. यंदा मे व जून महिन्यांमध्ये गुरू व शुक्राचा अस्त असल्याने लग्नासाठी फारसे मुहूर्त नाही.
त्यामुळे वर-वधू माता-पित्यांना एप्रिलच्या महिनाभरात लग्न उरकावे लागणार आहे. हे मुहूर्त हुकले तर थेट जुलै महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यंदा डिसेंबर महिन्यापर्यंत केवळ ३६ मुहूर्त शिल्लक आहेत. विवाह हा १६ संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार आहे. हिंदू धर्मात वधू-वरांचे वैवाहिक जीवन शुभ आणि मंगलमय राहावे, यासाठी मुहूर्त आणि तारखांचा विचार करून लग्नाची तारीख ठरवली जाते. २०२४ मध्ये लग्नासाठी ७५ मुहूर्त आहेत. यंदा १६ जानेवारीपासून सनई चौघडे वाजण्यास सुरुवात झाली आहे.
विवाह सोहळ्यासाठी एप्रिल २०२४ मध्ये दिनांक १८, १९, २०, २१, २२, २३, २४, २५, २६ तर मे महिन्यामध्ये केवळ २ मुहूर्त आहे. जून महिन्यामध्ये देखील २९ व ३० मुहूर्त आहे. जुलैमध्ये दिनांक ६, ९, ११, १२, १३, १४, १५ व नोव्हेंबरमध्ये दिनांक १७, १८, २२, २३, २४, २५, २६, २७ व डिसेंबर महिन्यामध्ये दिनांक ३, ४, ५, ६, ७, १९, १२, शे हे मुहूर्त आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्यासाठी लागणारे मंगल कार्यालय, आचारी, मंडपासह विवाहसाठी लागणाऱ्या वस्तू बुकिंग सुरू आहेत.
२५ जूननंतर मुहूर्त
मागील तीन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे उरकले आहे. आता एप्रिल महिन्यात केवळ १३ मुहूर्त शिल्लक आहेत. त्यापैकी चार मुहूर्त पार पडले आहे. अद्याप ९ मुहूर्त शिल्लक असून येत्या मे आणि जूनमध्ये लग्नासाठी फारसे मुहूर्त नाही, अशी स्थिती २४ वर्षांनंतर आलेली आहे.
यंदा ८ मे पासून १ जूनपर्यंत गुरूचा अस्त आहे. तर ६ मे पासून शुक्राचा अस्त होणार आहे. त्यामुळे २५ जूनला शुक्र उगवल्यानंतर लग्नाच्या मुहूर्ताना सुरुवात होईल. म्हणून विवाह ठरलेल्या वर-वधू माता-पित्यांना एप्रिल महिन्यामध्ये विवाह सोहळे उरकावे लागणार असल्याचे पुरोहित राजेंद्र निद्रे यांनी सांगितले.