Weather Update : शेतकऱ्यांमागे गेल्या काही वर्षांपासून संकटांची मालिका कायम आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आधीच खूप मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगाम देखील फेब्रुवारी महिन्यापर्यंत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत होता. रब्बी हंगामातील हवामान पिकांसाठी पोषक होते. यामुळे रब्बी हंगामातून चांगले उत्पादन मिळेल अशी अशा शेतकऱ्यांना होती, जाणकार देखील याला दुजोरा देत होते.
मात्र 4 मार्चपासून ते ८ मार्चपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली. या कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात गारपीट सदृश्य पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिके भोई सपाट झाली. हरभरा, गहू, केळी, पपई, डाळिंब, द्राक्ष यांसारख्या शेती पिकांना याचा फटका बसला.
या गारपीट आणि अतिवृष्टी मधून जी काही पिके वाचली आहेत त्या पिकांना पुन्हा एकदा अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारपासून चार दिवस राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. 13 मार्चपासून ते 17 मार्चपर्यंत राज्यात पावसाची शक्यता राहणार आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना आपल्या शेती पिकांची आणि आपली काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 13 मार्च पासून ते 16 मार्च पर्यंत जळगाव, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, परभणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तसेच 15 ते 16 मार्च दरम्यान नागपूर, सातारा, लातूर, गोंदिया, सांगली, लातूर, धाराशिव, हिंगोली, बुलडाण्यात पाऊस हजेरी लावू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या कालावधीमध्ये वादळी वारा देखील वाहणार आहे. 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहतील त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष सजग राहण्याचे आवाहन केले जात आहे. वास्तविक, 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान राज्यातील पुणे अहमदनगर, नासिक, धुळे, छत्रपती संभाजी नगर यासह विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अशातच पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे.