तंत्रज्ञान आणि विज्ञान यांचा वापर आता मोठ्या प्रमाणावर प्रत्येक क्षेत्रात होऊ लागला असून अनेक अशक्य गोष्टी या तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवाला शक्य झालेले आहेत. परंतु आज देखील जर आपण बघितले तर निसर्गावर मात्र कुठल्याही पद्धतीचे नियंत्रण मिळवण्यामध्ये मानव यशस्वी झालेला नाही.
परंतु आता याही दृष्टिकोनातून मानवाचा प्रयत्न सुरू असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. याप्रमाणे जर आपण भारतीय हवामान शास्त्रज्ञांचा विचार केला तर ते आता येणाऱ्या पाच वर्षात पाऊस, गारपीट आणि विजांचा कडकडाट या नैसर्गिक गोष्टींवर देखील नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून ते येणाऱ्या पाच वर्षात यावर नियंत्रण ठेवू शकतील.
याकरिता आता मिशन मौसम राबविण्यात येणार असून या अंतर्गत भारत क्लायमेट स्मार्ट आणि क्लायमेट रेडी होणार आहे व यामध्ये मौसम जीपीटी ॲप देखील लॉंच केले जाणार आहे.
हे ॲप्लिकेशन चॅट जीपीटी सारखे असणार असून एप्लीकेशनच्या माध्यमातून युजरला हवामानाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होणार आहेच व याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी दिली.
आर्टिफिशियल वेदर मोडिफिकेशनवर होणार काम
पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी म्हटले की, ज्या ठिकाणी पावसाची जास्त प्रमाणात गरज असेल त्या ठिकाणी क्लाऊड सीडींग केले जाईल व येणाऱ्या पाच वर्षाच्या आत आम्ही आर्टिफिशियल वेदर मोडिफिकेशन वर काम करू.
तसेच पुढे त्यांनी म्हटले की आम्ही हवामान अंदाज प्रणाली सुधारू व ज्यामुळे हवामान अंदाजाची जी काही अचूकता आहे त्यामध्ये पाच ते दहा टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. जर हवामानासंबंधी अगोदरच अचूक माहिती मिळाली तर पाऊस देखील रोखता येईल असे देखील त्यांनी म्हटले.
काय होईल केंद्र सरकारच्या या मिशन मौसमचा फायदा?
या मिशन मौसमच्या अंतर्गत येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती जसे की ढगफुटी,तसेच अतिवृष्टी व दुष्काळ सारख्या समस्या टाळता येतील. या मिशनमुळे आपत्ती व्यवस्थापन तसेच कृषी, संरक्षण व विमान वाहतूक, जल स्त्रोत, पर्यटन इत्यादीना देखील मोठा फायदा होईल.
मौसम मिशन अंतर्गत अत्याधुनिक असे सेंसर वापरण्यात येणार आहेत व यासोबत नेक्स्ट जनरेशन रडार आणि सॅटॅलाइट सिस्टम देखील बसवण्यात येणार आहे व उच्च क्षमतेच्या सुपर कम्प्युटरचा वापर यामध्ये केला जाणार आहे. तसेच जीआयएस आधारित एक स्वयंचलित समर्थित प्रणाली देखील वापरली जाणार आहे.
एआय आधारित ॲप देईल हवामान संबंधी अचूक माहिती
हे एक एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित ॲप असून या माध्यमातून हवामानाशी संबंधित माहिती मिळणे शक्य होणार आहे. म्हणजे सकाळी सूर्यप्रकाश बघून प्लॅन बनवायचा आणि पावसाने बिघडवायचा असे आता यामुळे होणार नाही.
या मिशन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक क्रमांक जारी करण्यात येणार आहे व हा क्रमांक डायल केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्राचा किंवा परिसराचा हवामान अंदाज लगेच मिळणे शक्य होणार आहे व विशेष म्हणजे हे सगळी माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर संदेशाच्या म्हणजेच एसएमएस च्या माध्यमातून प्राप्त होणार आहे.
जगातील या देशांमध्ये अगोदरच वापरले जात आहे हे तंत्रज्ञान
जागतिक परिस्थितीच्या दृष्टिकोनातून बघितले तर कॅनडा, चीन, रशिया, यु एस आणि ऑस्ट्रेलियामध्ये विमानाचा वापर करून क्लाऊड सीडींग च्या माध्यमातून पाऊस रोखण्यासाठी आणि वाढवण्यासाठीचे तंत्र अगोदरच वापरले जात आहे. कृत्रिम पावसाचे तंत्रज्ञान हे भारतामध्ये देखील वापरले गेलेले आहे.
यामध्ये विमानातून ढगांमध्ये आवश्यक ती रसायने सोडली जातात व त्यामुळे ढगांचे पाण्यात रूपांतर होऊन पाऊस पडतो व यालाच क्लाऊड सीडींग असे म्हणतात. हा पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी देखील राबवण्यात आलेला आहे. अशाप्रकारे या क्लाऊड सीडींग तंत्रज्ञानाचा वापर गारपीट कमी करून फळबागा आणि धान्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी इतर देशात केला जात आहे.