स्पेशल

कशी आहे नेमकी हायपरलूप ट्रेन? पुण्याहून मुंबई गाठायला लागतील फक्त 25 मिनिटे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published by
Ajay Patil

Hyperloop Train:- भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून वाहतूक आणि दळणवळणाच्या सोयी या अतिशय वेगवान करण्याच्या दृष्टिकोनातून वंदे भारत एक्सप्रेस विकसित करण्यात आली व देशातील आज बऱ्याच महत्त्वाच्या शहरांना जोडण्याच्या दृष्टिकोनातून वंदे भारत महत्वाची भूमिका पार पाडत आहे.

देशातील अनेक ठिकाणी आज वंदेभारत ट्रेन सुरू असून वंदे भारत ट्रेनमुळे प्रवाशांना अत्याधुनिक अशा सोयी सुविधा आणि वेगवान प्रवासाची अनुभूती मिळते.

परंतु आता भारतीय रेल्वे याही पुढे जात हायपरलूप ट्रेन विकसित करणार असून या ट्रेनसाठी 410 किलोमीटरसाठी आवश्यक ट्रॅक तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या हायपरलूप ट्रेन साठीचा आवश्यक ट्रॅकचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.ही एक हायस्पीड ट्रेन असून ती एका व्हॅक्युम ट्यूबमधून धावेल व चुंबकीय तंत्रज्ञानाचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.

काय आहेत हायपरलूप ट्रेनची वैशिष्ट्ये?
हायपरलूप ट्रेन ही एक हायस्पीड ट्रेन असणार आहे व ती व्हॅक्युम ट्यूब मधून धावेल. या ट्रेनमध्ये चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून या ट्यूबमध्ये या ट्रेनचा ताशी वेग 1100 ते 1200 किलोमीटर असणार आहे. भारतामध्ये जी हायपरलूप ट्रेन विकसित करण्यात येत आहे तिचा कमाल वेग 600 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे विजेचा अतिशय कमी वापर करते व प्रदूषण कमी करण्यासाठी देखील याची मदत होईल.विशेष म्हणजे बुलेट ट्रेनपेक्षा या ट्रेनचा वेग जास्त असल्याने नक्कीच वेगवान प्रवासासाठी हायपरलूप ट्रेन येणाऱ्या काळात फायद्याची ठरणार आहे.

या ट्रेनचा वेग इतका असतो की दिल्ली ते पाटणा हे अंतर एक तासात ही रेल्वे कापू शकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील पहिली हायपरलूप ट्रेन मुंबई ते पुणे या दोन शहरात दरम्यान धावेल असा एक दावा करण्यात येत आहे.

येणाऱ्या भविष्यकाळात जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा मुंबई ते पुणे हे अंतर केवळ 25 मिनिटांमध्ये पूर्ण करता येईल.तसेच या ट्रेनचे तिकीट हे विमानाच्या तिकिटाइतकेच असेल अशी एक शक्यता आहे. कमी वेळेत न थांबता जास्त दूरचा प्रवास करता येणे या ट्रेनच्या माध्यमातून शक्य होणार आहे. तसेच मध्यंतरी कुठे थांबा असण्याची बिलकुल शक्यता या ट्रेनमध्ये नाही.

दोन शहरातील प्रवासासाठी ही ट्रेन फायद्याची ठरेल. हायपरलूप ट्रेनच्या एका पॉडमध्ये साधारणपणे 24 ते 28 प्रवासी बसू शकतात. अमेरिकेमधील लॉस एंजलिस व सॅन फ्रॅन्सीको या दोन शहरा दरम्यान न थांबता वेगवान प्रवासासाठी एलॉन मस्क यांनी 2013 मध्ये ही संकल्पना मांडली होती.

Ajay Patil