स्पेशल

कधी सुरू होईल पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना? तरुणांना कसा मिळेल या योजनेचा फायदा? जाणून घ्या माहिती

Published by
Ajay Patil

Scheme For Youth:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक महत्त्वाच्या अशा योजना राबवल्या जातात. जेणेकरून समाजातील प्रत्येक घटक हे सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून स्वावलंबी व्हावेत आणि त्यांची प्रगती आणि पर्यायाने देशाची प्रगती या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.

तरुणांच्या बाबतीत जर सध्या बघितले तर बेरोजगारीची समस्या खूप मोठी असल्याने या दृष्टिकोनातून देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक पावले उचलण्यात येत आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे केंद्र सरकारची प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना होय. ही एक तरुणांसाठी महत्त्वाची अशी केंद्र सरकारची योजना आहे.

ही महत्त्वाची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये 2 डिसेंबरला प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार होती. परंतु ती काही सुरू केली गेली नाही व त्यामुळे आता ही योजना नेमकी कधी सुरू केली जाईल? हे मात्र स्पष्ट झालेले नाही. परंतु नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.

युवकांना बारा महिने कंपन्यांमध्ये काम करण्याची मिळेल संधी
पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांना बारा महिने प्रत्यक्ष कंपन्यांमध्ये काम करण्याचे संधी मिळणार असून या योजनेची दोन टप्पे असणार आहेत व ही प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून देशातील साधारणपणे 1.25 लाख तरुणांना शिकाऊ प्रशिक्षण दिले जाणार आहे व त्याकरिता कार्पोरेट मंत्रालयाने विशेष वेबसाईट देखील तयार केली आहे. या माध्यमातून तरुणांकडून अर्ज देखील मागवण्यात आलेले होते. यामध्ये 12 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर अशी अर्ज करण्याची मुदत होती व नंतर यामध्ये अर्ज भरायला 15 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.

यात पहिल्या टप्प्याकरिता एकूण प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून या योजनेकरिता तरुणांची निवड केली जाणार आहे. परंतु प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी पूर्ण न झाल्यामुळे ही योजना आता पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. देशातील लिस्ट असलेल्या 500 कंपन्यांमध्ये तरुणांना शिकाऊ प्रशिक्षण घेण्याची तरतूद या योजनेत आहे.

तरुणांना काय मिळतील फायदे?
या योजने करिता अर्जदार दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. पात्र झालेल्या तरुण-तरुणींना थेट कंपन्यांमध्ये काम करता करता प्रशिक्षण मिळणार आहे व त्यांना रोजगाराच्या शक्यता देखील वाढणार आहेत.

या योजनेअंतर्गत तरुणांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांचा प्रशिक्षण भत्ता दिला जाणार आहे व त्यातील 4500 रुपये केंद्र सरकार देईल व पाचशे रुपये कंपन्या देणार आहेत.

या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलैमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. या योजनेकरिता दोन हजार कोटींची अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आलेली आहे व 20 नोव्हेंबर पर्यंत सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. साधारणपणे 21 ते 24 वयोगटातील तरुण-तरुणींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Ajay Patil