विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपले असून आता या निवडणुकांच्या निमित्ताने प्रत्येक पक्षाने मोर्चे बांधणी सुरू केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कार्यकर्त्यांमध्ये देखील आता उत्साह संचारला असून प्रत्येक पक्षाकडून या निवडणुकीच्या बाबतीत संपूर्ण प्लॅनिंग केले जात असल्याचे चित्र आहे.
आपण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले व यामध्ये महाराष्ट्रात महायुती पेक्षा महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले व हेच मिळवलेले यश विधानसभा निवडणुकीत टिकवून ठेवणे महाविकास आघाडी पुढे खरे आव्हान आहे. या सगळ्या धामधुमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्चीवर या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी येणार असून महायुती सत्तेच्या बाहेर फेकली जाईल असा अंदाज मत चाचणी द्वारे लोकपोलने केला आहे.
या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला स्पष्टपणे बहुमत मिळेल व महायुतीला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील असे लोकपोलने म्हटले आहे. लोकपोलने त्यांच्या एक्स अकाउंट वर शेअर केलेल्या आकडेवारीनुसार आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 141 ते 154 जागांवर विजय संपादन करेल व सत्तेसाठी आवश्यक असलेले संख्याबळ जुळवण्यामध्ये यशस्वी होईल.
परंतु या उलट आताच्या सत्ताधारी महायूतीला दुसऱ्या क्रमांकाच्या 115 ते 128 जागांवर समाधान मानावे लागेल. त्यासोबतच अपक्ष व इतर छोट्या पक्षांचे उमेदवार पाच ते 18 जागांवर निवडून येतील अशी देखील शक्यता यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रात विभागनिहाय कुणाला किती मिळणार जागा?
लोकपोलच्या या सर्वेमध्ये महाराष्ट्रातील विभागनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार बघितले तर…..
मराठवाडा विभागातील 46 जागांपैकी 24 ते 30 जागा महाविकास आघाडीला तर पंधरा ते वीस जागा महायुतीच्या वाट्याला येतील. शून्य ते दोन जागा अपक्ष किंवा इतर पक्षांना जातील असा अंदाज आहे.
विदर्भात एकूण 62 जागा असून त्यातील 40 ते 45 जागा महाविकास आघाडीला तर 15 ते 20 जागा महायुतीला जातील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
उत्तर महाराष्ट्रात एकूण 47 जागा असून त्यातील 20 ते 25 जागा महाविकास आघाडीला आणि तेवढ्याच वीस ते पंचवीस जागा महायुतीला जातील असा अंदाज असून उत्तर महाराष्ट्रात शून्य ते दोन जागांवर अपक्ष व इतर छोटे पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकतात.
ठाणे आणि कोकणातील 39 जागांपैकी महायुतीला 25 ते 30 जागा तर महाविकास आघाडीला पाच ते दहा जागांवर समाधान मानावे लागेल. इतकेच नाही तर एक ते तीन आमदार हे इतर किंवा अपक्ष म्हणून निवडून येऊ शकतात.
मुंबईतील 36 जागांपैकी दहा ते पंधरा जागा महायुतीला व 20 ते 25 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जातील. तसेच शून्य ते एक जागा इतर पक्षांना मिळेल असे देखील सर्वेक्षणामध्ये सांगण्यात आलेले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील 58 जागांपैकी 20 ते 25 जागा महायुती व 30 ते 35 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जातील व एक ते पाच जागा इतर पक्षांना मिळतील असे देखील सर्वेक्षणामध्ये सांगण्यात आलेले आहे.