स्पेशल

महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट ! पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये मान्सून राज्यात दाखल होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Maharashtra Rain : राज्यात काही ठिकाणी पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून, पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये मान्सून राज्यात दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

मान्सूनची प्रगती सुरू असून, सोमवार, ३ जून रोजी कर्नाटक, रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या आणखीकाही भागांत प्रगती केली. तसेच अरबी समुद्राचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मान्सून दाखल झाला आहे.

पुढील ४ ते ५ दिवसांत मान्सून दक्षिण महाराष्ट्र, गोव्यात दाखल होऊ शकतो. तसेच कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा उर्वरित भाग, छत्तीसगड आणि ओडिसा, तर बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मान्सूनची सीमा कर्नाटकातील होन्नावर बल्लारी, आंध्र प्रदेशातील कुरनूल, तेलंगणातील नरसापूर आणि पश्चिम बंगालमधील इस्लामपूर या भागात होती. मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे.

येत्या ४ ते ७ जूनदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस व सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यात अनेक शहरांच्या तापमानात घट होऊ लागली आहे. काही भागांत पाऊस पडला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24