आजकालच्या कालावधीमध्ये विमा घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यातल्या त्यात कोरोना कालावधीपासून आरोग्य विम्याला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे व याकरिताच अनेक विमा कंपनीच्या माध्यमातून आकर्षक असा पॉलिसी आणल्या जात आहेत. अशाच प्रकारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकने परवडणाऱ्या प्रीमियमवर दोन अपघात कव्हर सुरू केले असून त्यांचे नाव हेल्थ प्लस आणि एक्सप्रेस हेल्थ प्लस असे असून या दोन्ही पॉलिसी एक वर्ष कालावधीचे आहेत. या पॉलिसींमध्ये अपघातामुळे येणारा मृत्यू तसेच अपंगत्व वैद्यकीय खर्च यासारख्या आर्थिक जोखमींमध्ये संरक्षण देण्यात येते.
कसे आहेत इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या या पॉलिसी?
यामध्ये हेल्थ प्लस विम्याची रक्कम 5 लाख रुपये असून यामध्ये दुर्दैवी मृत्यू किंवा कायमस्वरूपी आणि वैयक्तिक अपंगत्व आल्यास विमाधारक व्यक्तीच्या कुटुंबाला विमा रकमेच्या शंभर टक्के रक्कम मिळते. एवढेच नाही तर मुलाच्या लग्नाकरिता ५० हजार रुपया पर्यंतची रक्कम देखील यामध्ये दिली जाईल.
तसेच या पॉलिसीमध्ये पॉलिसी धारकाचे जर अपघातात हाड फ्रॅक्चर झाले तर 25 हजार रुपयांची विमा रक्कम मिळेल व या हेल्थ प्लसचा वार्षिक प्रीमियम सर्व करांसह 355 रुपये आहे. तसेच यामध्ये एक्सप्रेस हेल्थ प्लस विमा पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तींना दहा लाख रुपयांची विमा कव्हर मिळते व यामध्ये दुर्दैवी मृत्यू किंवा कायमस्वरूपी आणि वैयक्तिक अपंगत्व आल्यास विमाधारकाच्या कुटुंबाला विमारकमेच्या 100% पर्यंत रक्कम मिळेल.
तसेच विमाधारक अपघातामध्ये जखमी झाल्यास त्याला उपचाराकरिता 25 हजार रुपयांची विमा रक्कम मिळेल. तसेच तो यामध्ये बेशुद्ध पडल्यास तीन महिने ते दहा आठवडे विमा रक्कम दर आठवड्याला एक टक्के दराने दिली जाईल. एवढेच नाही तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या एक्स्प्रेस हेल्थ प्लस पॉलिसीमध्ये विमाधारकाला ओपीडी खर्च न जोडता अपघात झाल्यास एक लाख रुपयांपर्यंतची अपघाती वैद्यकीय प्रतिपूर्ती देखील मिळेल.
समजा एक्सप्रेस हेल्थ प्लस पॉलिसी घेतलेल्या पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला अंत्यसंस्काराच्या खर्चा करिता पाच हजार रुपयांचा दावा मिळू शकतो.तसेच मुलांच्या शिक्षणासाठी 50 हजार पर्यंत रक्कम मिळू शकते. या एक्सप्रेस हेल्थ प्लस पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम सर्वकरांसहित 555 आहे. म्हणजे हे सर्व फायदे तुम्हाला फक्त 46.25 रुपये प्रति महिना प्रीमियमवर मिळू शकतात.