अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- भारताने न्यूझीलंड विरुद्ध कोलकातामध्ये झालेली तिसरी टी २० मॅच ७३ धावांनी जिंकली. या विजयासह भारताने न्यूझीलंड विरुद्धची तीन टी २० मॅचची सीरिज ३-० अशी जिंकली.
पहिली मॅच पाच विकेट राखून आणि दुसरी मॅच सात विकेट राखून भारताने जिंकली होती. रोहितने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
त्याने ईडनवर आपला खेळ पुन्हा बहरत मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक ठोकले. रोहितच्या ५६ धावा आणि शेवटी दीपक चहरने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २० षटकात ७ बाद १८४ धावा केल्या.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे फलंदाज १७.२ षटकात १११ धावांवर ढेपाळले. भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक ९ धावांत ३ बळी घेतले. तर हर्षलला २ बळी घेता आले.
या मॅचमध्ये तीन ओव्हरमध्ये नऊ धावा देत न्यूझीलंडच्या डेरिल मिचेल, मार्क चॅम्पमन आणि ग्लेन फिलिप्स या तिघांना बाद करणारा अक्षर पटेल मॅन ऑफ द मॅच झाला. संपूर्ण सीरिजमध्ये उत्तम कामगिरी करणारा टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराचा मानकरी झाला.