Categories: क्रीडा

रवींद्र जडेजाची अपयशी लढत; भारताने मालिका गमावली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

ऑकलंड : प्रमुख फलंदाजांनी केलेल्या चुकांची किंमत शनिवारी भारतीय संघाला मोजावी लागली. यजमान न्यूझीलंडने हॅमिल्टनपाठोपाठ ऑकलंडमधील दुसरा सामनाही जिंकून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली.

मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी ११ फेब्रुवारीला खेळला जाईल. याआधी झालेले पाचही सामने जिंकून भारतीय संघाने न्यूझीलंडला ट्वेण्टी-२० मालिकेत न्यूझीलंडला ५-० असा ‘व्हाईटवॉश’ देण्याचा पराक्रम केला.

पण ती किमया त्यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र करता आली नाही. येथील एडन पार्कवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचे भरवशाचे फलंदाज बाद होत असताना तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन विजयश्री खेचून आणण्याचे रवींद्र जडेजाचे झुंजार प्रयत्न तोकडे पडले आणि भारताला २२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. अनुभवी मार्टिन गपटील आणि हेनरी निकोल्सने १०५ चेंडूंत ९३ धावांची सलामी दिली.

युजवेंद्र चहलनेच निकोल्सला ४१ धावांवर बाद करून जी जोडी फोडली. टॉम ब्लंडेल २२ धावा काढून शार्दुल ठाकूरचा बळी ठरला. पहिल्या सामन्यात नाबाद शतक झळकावून न्यूझीलंडला विजय मिळवून देणाऱ्या रॉस टेलरने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत अर्धशतक झळकावले. न्यूझीलंडची स्थिती ३ बाद १७० अशी असताना आणि रॉस टेलर एका बाजूने शतकाकडे वाटचाल करत असताना न्यूझीलंड ५० षटकांत ३०० धावांपर्यंत मजल मारेल, अशी अपेक्षा होती.

भारतीय गोलंदाजांनी खचून न जाता दुसऱ्या बाजूने न्यूझीलंडच्या ५ फलंदाजांना बाद करत वेसण घातल्यामुळे न्यूझीलंडला ८ खेळाडूंना गमावून २७३ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतातर्फे युजवेंद्र चहलने ५८ धावांत ३, तर शार्दुल ठाकूरने ६० धावांत २ बळी मिळवले. रॉस टेलर ७४ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकार ठोकून ७३ धावांवर नाबाद राहिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनीला बाद करणारा तेज गोलंदाज कायल जेमीसन सामनावीर ठरला.

अहमदनगर लाईव्ह 24