अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- मूल जन्माला घालू शकत नाही म्हणून एका महिलेची सासरच्यांकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे.
नवादा जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पाकरी गावात हत्या केल्यानंतर महिलेच्या मृतदेह परस्पर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार उरकण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलीस वेळेत दाखल झाले आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला.
महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेचा पती आणि सासऱ्याला अटक केली. हिसुआ पोलीस स्टेशन हद्दीतील घुरिहा गावातील सुनील कुमार यांच्या मुलगी पंपी कुमारी (29 वर्षे) हिचा पाकरी गावातील शैलेंद्र सिंह यांचा मुलगा नितीश कुमार याच्यासोबत आठ वर्षांपूर्वी हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह झाला होता.
लग्नाला 8 वर्षे उलटले तरी घरात पाळणा हलत नव्हता. पत्नीला मूल होत नसल्याने पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत असत. तसेच सूनेला मूल होत नाही म्हणून सासरचे लोकही महिलेचा सतत छळ करायचे.
मुलीचा सासरी छळ होत असल्याने तिच्या माहेरच्या लोक आणि सासरच्यांमध्येही वाद होत होते. हाच वाद मिटवण्यासाठी दोन्ही कुटुंबांमध्ये पंचायतही झाली होती.
मूल होत नाही म्हणून पती व सासरच्यांनी महिलेला जबर मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या मारहाणीमुळे महिलेची प्रकृती खालावल्याने तिला आधी नवादा आणि नंतर पाटणा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.