अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविडची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
क्रिकेट सल्लागार समितीने राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी एकमताने निवड केली. T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारणार आहे.
T-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्रीचा कार्यकाळ संपणार असून आता द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया खेळेल. राहुल द्रविड भारत-न्यूझीलंड मालिकेपासून प्रशिक्षकपदाची सुरुवात करणार आहे.
द्रविडने काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं होतं. त्यावेळी भारताने विजयही मिळवला होता. तेव्हापासून द्रविडला मुख्य संघाचा हे़ड कोच करण्यात यावं अशा मागणीने जोर धरला होता.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर राहुल द्रविडने प्रतिक्रिया दिली आहे. हे पद मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे आणि या भूमिकेसाठी आपण तयार आहोत, असं राहुल द्रविडने म्हटलं आहे.
द्रविडची नियुक्तीहोताच त्याला अनेकांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. यावेळी बीसीसीआय अध्यक्ष आणि राहुलचा माजी सहकारी सौरव गांगुलीने राहुलच्या नियुक्तीवर आनंद व्यक्त केला आहे.
तो म्हणाला, ‘राहुल एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने अनेक वर्ष अप्रतिम खेळ दाखवला असून नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचा प्रमुख म्हणूनही त्याने काम पाहिलं आहे. आता हेड कोच होऊन तो संघाला आणखी मोठ्या यशाच्या शिखरांवर नेईल अशा मला आशा आहे.’