अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- पगारापासून ते विविध मागण्यांसाठी सुरु झालेला एसटी संप चिघळला आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांत सुरु झालेल्या या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी, महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

हायकोर्टात झालेल्या सुनावणीवेळी या विलिनीकरणाबाबत सरकार एक समिती स्थापन करीत असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले, मात्र या प्रस्तावावर नकार दर्शवत कर्मचाऱ्यांनी संप मागे घेणार नसल्याचे निक्षून सांगितले आहे. त्यामुळे संपाची कोंडी अद्यापही कायम आहे.

सोमवारी राज्यातील २५० पैकी २२३ एसटी डेपो बंद होते. कोर्टानेही या प्रकरणात तोडगा काढण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. दिवाळीच्या काळात राज्यातील एसटी सेवा कोलमडल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. बीड आणि ब्रह्मपुरीत एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने संप अधिकचट चिघळला आहे.

बीड येथे संपकरी अशोक कोटवार या चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर ब्रह्मपुरीत वाहतूक नियंत्रक पदावर असलेल्या सत्यजित ठाकूर या कर्मचाऱअयानेही विष पिवून आत्महत्या केली आहे. त्यांची पत्नी नागपूरला राहते.

दोन दिवसांपूर्वी ते नागपूरला येऊन गेले होते. नंतर परतल्यानंतर त्यांचा फोन बंद येत होता. त्यानंतर त्यांनी अतमहत्या केल्याचे उघड झाले आहे. आत्तापर्यंत ४० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.