file photo

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  राज्यातील एसटी कर्मचारी विलगिकरणाच्या मागणीसाठी संपावर गेलेले आहेत.या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असताना मात्र राज्यात आंदोलन चिघळवणाऱ्या घटना घडत आहेत.

अशीच एक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. जामखेड अगराच्या नगर-जामखेड या बसवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. त्यामुळे परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

परिवहन मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील बैठकी नंतर केलेल्या आवाहनस काही कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

त्याप्रमाणे जामखेड आगारात देखील काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.त्यांच्यामार्फत बससेवा सुरू करण्यात येत आहे. कामावर हजर झालेले कर्मचारी नगरहून जामखेडला प्रवासी घेऊन निघाले होते.

सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जामखेड अगाराची नगर-जामखेड बस (एम. एच ४० ए.क्यु. ६२२४) सुमारास नगरहून जामखेडकडे निघाली होती. बस आष्टीजवळ गांधनवाडी फटा येथे आली असता दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी या बसवर दगडफेक केली आहे.

यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून, बसचे नुकसान झाले आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. संबंधीत बसच्या चालकाने बस आष्टी पोलीस ठाण्यात नेऊन फिर्याद दाखल केली आहे. संप सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे.

मधल्या काळात झालेली पगारवाढ, चर्चा, प्रस्ताव मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. असे असेल तरी अनेक कर्मचारी कामावर हजर होत आहे.

काही ठिकाणी सेवानिवृत्त आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेऊन एसटीने सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत भीती निर्माण करून संप चिघळविण्याचे प्रकारही सुरू असल्याचे दगडफेकीच्या घटनांवरून दिसून येते. याचा परिणाम कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांवर होत आहे