अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Krushi news : देशातील नवयुवक एकीकडे वडिलोपार्जित शेतीकडे पाठ फिरवीत नोकरीच्या मागे धावत आहेत. शेतीमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने नवयुवक शेतकरी पुत्रांचा शेती ही केवळ तोट्याचीचं आहे असा गैरसमज झाला आहे.

मात्र असे जरी असले तरी देशात असे अनेक शेतकरी (Farmer) पुत्र आहेत जे सुशिक्षित असून देखील नोकरी मागे न धावता शेती कसून चांगले उत्पन्न अर्जित करीत आहेत.

हैद्राबाद (Hyderabad) मधील एक शेतकरी देखील असेच एक नवयुवक आहेत ज्यांनी नोकरीकडे पाठ फिरवली आणि शेती करून चांगले उत्पन्न कमवीत आहेत.

विशेष म्हणजे हैदराबादचा रहिवासी असलेला तरुण बोंगुराम राजू, ज्यांना त्यांच्या गावात राहायचे आहे त्यांच्यासाठी एक प्रेरणा आहे. कारण की, राजू भारत बायोटेक (Bharat Biotech) सारख्या मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता, त्याला पगार देखील समाधान कारक होता पण तो नोकरी करत असताना आयुष्यात समाधानी नव्हता.

याशिवाय शेतीत रसायनांच्या वाढत्या वापराबाबत राजू मोठ्या चिंतेत होता. शेतात रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे मानवावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करून तो खूप अस्वस्थ झाला होता.

त्यानंतर मात्र मग त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि शेती करण्याचा निर्णय घेतला आणि तेलंगणामधील हबसीपूर या गावी गेले.

त्यांच्या गावातील लोक पारंपरिक शेती करायचे. त्यांनी या पारंपारिक शेतीला बगल देण्याचा निर्णय घेतला. हबसीपूर गावातील शेतकऱ्यांनी लागवड न केलेल्या देशी धानाच्या वाणांची लागवड राजूने केली.

सेंद्रिय शेतीची कास धरली मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राजूने आपल्या शेतात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळण्याचा निर्णय घेतला.

म्हणजेच त्याने सेंद्रिय शेती (Organic Farming) करण्यास सुरवात केली आणि खत म्हणुन शेणखत आणि कीटकनाशकासाठी निंबोळी तेलाचा वापर पिकांसाठी सुरू केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्याने सेंद्रिय शेती यशस्वी करून दाखवली.

याचा त्यांना, तसेच आजूबाजूच्या परिसराला देखील फायदा झाला. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी राजुचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि सेंद्रिय शेतीची कास धरून शेती करण्यास सुरुवात केली.

शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायाची जोड राजू यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, त्याचे आई-वडील आणि सासरचे लोक त्याच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाने खूप नाराज झाले होते, परंतु त्याच्या पत्नीने त्याला कायम साथ दिली.

राजूसाठी, त्याच्या पत्नीने हैदराबादमधील कॉर्पोरेट शाळेत शिक्षिकेची नोकरी सोडली. या दाम्पत्याने नोकरी सोडल्यानंतर दोघं मिळून साडेचार एकर क्षेत्रात मणिपूर ब्लॅक राइस, कुजी पाटली, दशमुठी रत्न चोळी, कलाबती या भाताच्या जातीची शेती करण्यास सुरवात केली आहे.

तसेच राजू फळे आणि भाजीपाल्याची लागवड करतात याशिवाय राजू पशुपालन देखील करतात यामध्ये ते मेंढीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत.